Join us

Navneet Rana: तुरुंगातून थेट दवाखान्यात, खासदार नवनीत राणा जे.जे. रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:09 IST

नवनीत राणा यांची भायखळा तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर, त्यांना थेट मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मुंबई - शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. जवळपास १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना कोर्टाने राणा दाम्पत्याला सक्त ताकिद देत कठोर अटीं घातल्या आहेत. जामीन मंजूर झाल्यानंतर नवनीत राणा यांना तुरुंगांतून थेट रुग्णालयात नेण्यात आलं. 

नवनीत राणा यांची भायखळा तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर, त्यांना थेट मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्यात आले. रात्री त्यांना पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

माध्यमांना बोलायचं नाही, अटी व शर्ती

राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटी घातल्या आहेत, त्यांचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे. राणा दाम्पत्याला चौकशीमध्ये सहकार्य करावे लागेल. पोलिसांना चौकशीसाठी बोलवायचं असेल तर २४ तास आधी राणा दाम्पत्यास नोटिस द्यावी लागेल. राणा दाम्पत्याला पुराव्यांसोबत कुठलीही छेडछाड करता येणार नाही. तसेच चौकशी सुरू असलेल्या कुठल्याही मुद्द्याबाबत त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कुठलेही प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारू नयेत, अशी माहिती राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिली. 

महापालिकेचे अधिकारी घरी पोहोचले

राणा दाम्पत्याचा मुंबई उपनगरातल्या खारमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम करण्यात आल्याचा ठपका मुंबई महापालिकेनं ठेवला आहे. पालिकेचे अधिकारी आज राणा दाम्पत्याच्या घरी पोहोचले होते. आवश्यक ते मोजमाप घेतल्याचे समजते. येथील घराचे अवैध बांधकाम हटवण्यासाठी मुदत देण्यात येईल. अवैध बांधकाम न हटवलं गेल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :नवनीत कौर राणातुरुंगहॉस्पिटलपोलिसन्यायालय