नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 07:27 IST2025-10-08T07:27:14+5:302025-10-08T07:27:47+5:30
‘मुंबई वन’ ॲपसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन; मुख्यमंत्री, दाेन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी महत्त्वाकांक्षी आणि देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रातील ऐतिहासिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, मुंबई मेट्रो लाईन-३ च्या (भुयारी मेट्रो) अंतिम टप्प्याचे राष्ट्राला समर्पण आणि ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे लोकार्पण होणार आहे. राज्यातील ४१९ आयटीआय व १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २,५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू होतील.
नवी मुंबई विमानतळाजवळील प्रांगणातील कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मेट्रो, लोकल, बससह ११ सेवांचे तिकीट एकाच ॲपवर
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुंबई वन’ या भारतातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे अनावरण होणार आहे. त्यातून मेट्रो, लोकल, बससह ११ सेवांचे तिकीट एकाच ॲपवर मिळणार आहे. कॅशलेस व डिजिटल वॉलेट्सवरून तिकीट काढता येईल.
वाहतुकीत क्रांतिकारी बदल
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडविणाऱ्या ३३.५ कि.मी. लांबीच्या पूर्ण भूमिगत मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे आचार्य अत्रे चौक-कफ परेड मार्गाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. प्रवाशांना दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा असणार आहे.
३० हजार आसने
नवी मुंबई विमानतळाजवळील प्रांगणात दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला सुमारे ३० हजार नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
त्यादृष्टीने आसन आणि मंडप व्यवस्था तयार केली आहे. या कार्यक्रमाला ६०० बसमधून भाजप कार्यकर्ते येणार आहेत.
नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण व उद्घाटनानंतर पंतप्रधान मुख्य समारंभस्थळी जाहीर सभेत नागरिकांना मार्गदर्शन करतील.
अल्पमुदतीचे
‘एसटीईपी’ कार्यक्रम
‘अल्प कालावधीचे रोजगारक्षम कार्यक्रम’ या अभिनव कौशल्य उपक्रमाचा प्रारंभ पंतप्रधान करणार आहेत.
राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण २,५०६ नवीन बॅचेस सुरू होणार आहेत.
या माध्यमातून ७५ हजार प्रशिक्षणार्थींना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात महिलांसाठी ३६४ विशेष बॅचेस असतील.
माेदी पाहणी करणार
पंतप्रधान मोदी हे उद्घाटन केल्यानंतर विमानतळावरील सोयी-सुविधांची पाहणी करतील. या विमानतळावरून डिसेंबर
२०२५ मध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची याेजना आहे.