नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 06:12 IST2025-10-04T06:12:24+5:302025-10-04T06:12:45+5:30
Navi Mumbai D. B. Patil International Airport:

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री
Navi Mumbai International Airport:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल. या अनुषंगाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या प्रस्तावाला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
याबाबत राज्य शासनाचा इरादा बदललेला असून केंद्र शासनाचाही वेगळा विचार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे नमूद केले. केंद्र शासनाने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशा नावाने परवानगी दिली होती, त्यामध्ये नामविस्तार होऊन आता ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे विमानतळाचे नामकरण होईल. राज्य शासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसारच विमानतळास नाव देण्यात येईल, असा प्रतिसाद पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विमानतळास ‘दिबां’च्या नावाचा ठराव विधिमंडळाने संमत केला असून प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.
आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार
नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. आंदोलने कोविड काळात देखील झाले असल्याने काही आंदोलनकर्त्यांवर कोविड तरतुदीनुसार गुन्हे दाखल असून असे गुन्हे नियमानुसार न्यायालयाच्या परवानगीने मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे, छत्रपती संभाजीनगर विमानतळांचाही नामविस्तार
पुणे येथील सध्याच्या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम यांचे, तर छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या नामविस्तारांनाही केंद्राकडून लवकरच मान्यता मिळेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.