'नियम व अटी लागू'सह 'डबल लाईफ' नाटकाला नाट्य परिषदेचे पुरस्कार

By संजय घावरे | Updated: May 25, 2024 18:55 IST2024-05-25T18:54:45+5:302024-05-25T18:55:42+5:30

नाट्य परिषदेचे व्यावसायिक व प्रायोगिक नाटक पुरस्कार जाहीर

Natya Parishad Award for the drama Double Life | 'नियम व अटी लागू'सह 'डबल लाईफ' नाटकाला नाट्य परिषदेचे पुरस्कार

'नियम व अटी लागू'सह 'डबल लाईफ' नाटकाला नाट्य परिषदेचे पुरस्कार

मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये 'नियम व अटी लागू' नाटकाला व्यावसायिक नाटक पुरस्कार, तर 'डबल लाईफ' नाटकाला संगीत नाटक पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. प्रायोगिक नाटक पुरस्कार 'आय अॅम पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ' आणि प्रायोगिक संगीत नाटक पुरस्कार 'संगीत जय जय गौरीशंकर' नाटकाला देण्यात येणार आहे.

नट्य परिदषेतर्फे दरवर्षी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलामध्ये १४ जून रोजी गो.ब. देवल स्मृति पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यावेळी व्यावसायिक व प्रायोगिक मराठी रंगभूमीवरील सर्व विभागांतील कलावंत, तंत्रज्ञांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार 'नियम व अटी लागू'साठी संकर्षण कऱ्हाडेला तर मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक दिग्दर्शकाचा पुरस्कार याच नाटकासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना, नेपथ्यकार विभागाचा पुरस्कार '२१७ पद्मिनी धाम'साठी संदेश बेंद्रे यांना, प्रकाश योजना पुरस्कार 'जर तरची गोष्ट'साठी अमोघ फडके यांना, पार्श्वसंगीतकार पुरस्कार 'आजीबाई जोरात'साठी सौरभ भालेराव यांना, तर रंगभूमीवरील रंगभूषाकार पुरस्कार 'कुर्रर्रर्र' नाटकासाठी उल्लेश खंदारे यांना घोषित करण्यात आले आहेत. 

व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेता 'नियम व अटी लागू'साठी संकर्षण कऱ्हाडे, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता 'ऑल द बेस्ट'साठी मयुरेश पेम, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता 'जर तरची गोष्ट'साठी आशुतोष गोखले यांना देण्यात येईल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 'इवलेसे रोप'साठी लीना भागवत, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री 'हीच तर फॅमिलीची गंम्मत'साठी शलाका पवार, सहाय्यक अभिनेत्री 'चारचौघी'साठी पर्ण पेठे यांना जाहिर झाला आहे. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक म्हणून रंगशारदा प्रतिष्ठानच्या 'डबल लाईफ'ची निवड करण्यात आली आहे. 

प्रायोगिक रंगभूमीवरील पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटक पुरस्कार मुंबई-वाघांबेच्या परस्पर सहाय्यक मंडळाच्या 'संगीत जय जय गौरीशंकर' नाटकाला जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक पुरस्कार नवी मुंबईच्या शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठानच्या  'आय अॅम पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ' नाटकाला घोषित झाला आहे. प्रायोगिक नाटक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार 'यह जो पब्लिक है'साठी विवेक बेळे यांना, सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार 'आय अॅम पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ'साठी प्रशांत निगडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 'दि फिअर फॅक्टर'साठी बकुळ धवनेला, संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक-अभिनेता  'संगीत जय जय गौरीशंकर' विशारद गुरव, सर्वोत्कृष्ट गायिका-अभिनेत्री 'संन्यस्त खड्ग'साठी शारदा शेटकर, सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार इरफान मुजावर यांना जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: Natya Parishad Award for the drama Double Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई