Join us

नाल्याचा नैसर्गिक जलप्रवाह वळविल्याने घरांत पाणी शिरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 15:05 IST

पावसाच्या पाण्याच्या वेगामुळे मेघवाडी येथील रहिवाशांच्या घरात पाणी

मुंबई : जोगेश्वरी पूर्व सर्वोदय नगर, कोकण नगर, एम.एस.बी कॉलनी येथील चाळीस वर्ष जुन्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह समांतर वळविण्यात आला. त्यामुळे नाल्याची संरक्षक भिंत कोसळली. शिवाय रहिवाशांच्या घरातही पाणी गेले. परिणामी वित्त हानी झाली. त्यामुळे संबंधित प्रकरणीची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

साधारणत: एक वर्षापूर्वी नैसर्गिक नाला भराव टाकून गायब करण्यात आला. नाल्याचा नैसर्गिक जलप्रवाह सरळ दिशेने वळविण्यात आला. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या वेगामुळे मेघवाडी येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. त्यांचे अतोनात नुकसान झाले. स्थानिक रहिवाशांना दिवस, रात्र जागून घरातील पाणी बाहेर काढावे लागले. या व्यतीरिक्त घरात गेलेल्या पाण्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होता. आता पुन्हा भविष्यात मेघवाडी परिसरातील रहिवाशांच्या घरात पाणी जाण्याचा धोका निर्माण झाला, अशी माहिती येथील मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी अनुसुचित जमाती विभाग अध्यक्ष सुनील कुमरे यांनी दिली.

दरम्यान, नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहाचा मार्ग बदलण्यासाठी शासनाचा पर्यावरण विभाग, मुंबई महापालिका, नगर विकास यांची परवानगी घेण्यात आली होती? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी समिती स्थापन करत नि:पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईपाऊसमुंबई मान्सून अपडेट