पोस्टाच्या तिकिटांची हुबेहूब नक्कल करून ८ कोटींचा घोटाळा; आंतरराज्यीय रॅकेट चालवणाऱ्या तिघांना मुंबईतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:30 IST2025-10-21T16:30:37+5:302025-10-21T16:30:50+5:30
सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पोस्टाच्या तिकिटांची हुबेहूब नक्कल करून ८ कोटींचा घोटाळा; आंतरराज्यीय रॅकेट चालवणाऱ्या तिघांना मुंबईतून अटक
Mumbai Crime: देशभर पसरलेल्या एका हाय-प्रोफाइल बनावट डाक तिकिटांच्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिल्ली आणि बिहारमधून आपले नेटवर्क चालवणाऱ्या या टोळीतील तीन आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली असून, त्यांच्या बँक खात्यातून सुमारे ८ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघड झाले आहेत. जनरल पोस्ट ऑफिसने दाखल केलेल्या तक्रारीनंतर एमआरए मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख व्यावसायिक राकेश बिंद, शम्सुद्दीन अहमद आणि लिपिक शाहिद रझा अशी करण्यात आली आहे. या तिघांनाही न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी अत्यंत हुबेहूब बनावट पोस्टाची तिकिटे तयार करत असे आणि ती मूळ किमतीच्या अर्ध्या दरात बाजारात विकत असे. अनेक सरकारी विभाग आणि खासगी संस्थांनाही ही बनावट तिकिटे विकली गेली असल्याची शक्यता आहे. या अवैध धंद्यातून आरोपींनी मोठ्या प्रमाणात नफा कमावला. यातूनच त्यांच्या बँक खात्यात ८ कोटी रुपयांहून अधिकच्या संशयास्पद व्यवहारातून आढळले आहेत.
डाक विभागाने काही लिफाफ्यांवर चिकटवलेल्या तिकिटांची तपासणी केली असता हा बनावटगिरीचा प्रकार उघडकीस आला. तिकिटे बनावट असल्याचे लक्षात येताच, विभागाने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. एमआरए मार्ग पोलिसांनी याप्रकरणी 'भारतीय न्याय संहिता'च्या कलम १७८ , १७९, १८०, १८१ आणि ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट दीर्घकाळापासून सक्रिय होते आणि त्याचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "या रॅकेटचा संबंध देशभरातील अन्य डाक फसवणुकीशी आहे का, याचा तपास आम्ही करत आहोत." बनावट तिकिटांच्या छपाईसाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर झाला, तसेच या तिकिटांचे खरेदीदार कोण आहेत, याचा तपास पोलीस डाक विभाग आणि सायबर टीमच्या मदतीने करत आहेत. पोलीस या संपूर्ण रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. डाक विभागाने नागरिकांना तिकीट विकत घेताना त्याची सत्यता पडताळण्याची आणि संशयित प्रकार आढळल्यास पोस्टात तक्रार करण्याची विनंती केली आहे.