'गेल्या अडीच वर्षात हे का केलं नाही?'; एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 15:20 IST2022-07-24T15:15:11+5:302022-07-24T15:20:02+5:30
खराब काम करणाऱ्या रस्ता ठेकेदार यांना तातडीने ब्लॅकलिस्ट करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे यांनी केली आहे.

'गेल्या अडीच वर्षात हे का केलं नाही?'; एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा सवाल
मुंबई- मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या खड्ड्यांनी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, यामुळे महापालिकेवर सातत्याने टीका होऊ लागली असतानाच आता येत्या दोन वर्षांत मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
चांगल्या दर्जाचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी शनिवारी मुंबई महापालिकेला केल्या आहेत.
एकनाथ शिंदेंच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागच्या महाविकास आघाडीमध्ये आपण नगरविकास विभागाचे अडीच वर्ष मंत्री होतात. राज्यातले नगरपालिका, महानगरपालिका हे सर्व आपल्या अधिपत्याखाली काम करत होते. त्या वेळेला मुंबई शहरातील खड्डे मुक्त का नाही केले? हा प्रश्न मुंबईतील नागरीकांच्या मनात निर्माण झाला आहे, असं महेश तपासे म्हणाले.
आज जेव्हा आपण घोषणा करतात याचा अर्थ असा आहे की, गेल्या अडीच वर्षामध्ये जेव्हा नगर विकास खात्याचे मंत्री होतात. त्या कार्य काळामध्ये मुंबईच्या विकासाठी काहीच उपयोग झाला नाही का? हीच त्याची कबुली आहे का. अशी विचारणा महाराष्ट्रातली जनता करत असल्याचं देखील महेश तपासे यांनी यावेळी सांगितलं. तसेच खराब काम करणाऱ्या रस्ता ठेकेदार यांना तातडीने ब्लॅकलिस्ट करा, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.
दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त करणार ही घोषणा मुख्यमंत्री श्री @mieknathshinde यांनी केली. मग गेल्या अडीच वर्षात हे का केले नाही? तुम्हीच नगरविकास मंत्री होतात ना ? खराब काम करणाऱ्या रस्ता ठेकेदार यांना तातडीने ब्लॅकलिस्ट करा . @CMOMaharashtra@NCPspeaks@mybmc@AjitPawarSpeaks
— Mahesh Bharat Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) July 24, 2022
दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आढावा बैठकीत रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. त्यानुसार, मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते बांधले जात आहेत. आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.
उर्वरित रस्ते सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रिटीकरणाला गती देण्यात आली आहे. २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होत आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. तर आणखी ४०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. उर्वरित ४२३.५१ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पुढच्याच वर्षी हाती घेतले जाईल.