Join us

Narendra Modi Live: पुढील ३ वर्षात मुंबईचा कायापालट; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'ट्रिपल' इंजिनचा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:08 IST

महाराष्ट्राचे लोक नशिबवान, ज्या हातातून भूमिपूजन झाले त्यांच्या हातूनच उद्धाटन होतेय. हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते व्हायला नको ही अनेकांची इच्छा होती. परंतु नियतीसमोर कुणाचे काही चालत नाही असं सांगत एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला टोला लगावला.

मुंबई - मुंबईचा विकास करायचा आहे. चेहरामोहरा बदलायच. गेले २० वर्ष झाले नाही ते ६ महिन्यात घडतेय. लोकांना बदल दिसतोय. विकासासोबत पुनर्विकासाचे प्रकल्पही मार्गी लावतोय. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय सरकारने केलाय. केंद्रात, राज्यात आपलं सरकार आहे. येणाऱ्या काही दिवसांत महापालिका निवडणुका येतील. तेव्हा विकासाचे डबल इंजिन त्याचे ट्रिपल इंजिनात रुपांतर होईल. मुंबईच्या विकासाची गती वाढेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

बीकेसीत झालेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केले. शिंदे म्हणाले की, दावोस दौऱ्यावर सौदी, जर्मनचे लोक भेटले त्यांनी विचारलं तुम्ही मोदींसोबत आहात ना. तर आम्ही त्यांची माणसे आहोत असं मी म्हटलं. मला सांगताना आनंद होतोय. मोदींचा करिश्मा भारतात आहेच पण दावोसमध्येही मोदींच्या नावाची डंका ऐकायला मिळतेय. हा आपला गौरव आहे. १ लाख ५५ हजार कोटींचे करार झाले पण त्यामागे आशीर्वाद मोदींचे होते. त्याठिकाणचे वातावरण पाहिल्यावर आनंद होतो. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे नाव जगातील प्रमुख नेत्यांच्या तोंडी आहे. G 20 चे अध्यक्षपद भारताला मिळालं हे आपल्यासाठी गौरवाशाली आहे. देशाची अर्थव्यवस्था एका उंचीवर नेली आहे. महाराष्ट्राला संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच महाराष्ट्राचे लोक नशिबवान, ज्या हातातून भूमिपूजन झाले त्यांच्या हातूनच उद्धाटन होतेय. हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते व्हायला नको ही अनेकांची इच्छा होती. परंतु नियतीसमोर कुणाचे काही चालत नाही. मुंबईसाठी जे विकास प्रकल्प आणतोय ते मोदींच्या हस्ते उद्धाटन होतोय. गेल्यावर्षी समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाली. नव्या वर्षात मुंबईतील प्रकल्प, मेट्रोचं उद्धाटन होतोय. मेट्रोच्या रुपाने मुंबईकरांचे स्वप्न साकार होतंय असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास किती झाला हे सगळ्यांना माहित्येय. ठप्प झालेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता त्यातून लोकांची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वामुळे. मी जेव्हा कधी मोदींना भेटतो तेव्हा त्यांच्याकडून ऊर्जा मिळतेय. येत्या २ वर्षात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना याच मेट्रोचं भूमिपूजन मोदींनी केले होते त्याच मेट्रोचं लोकार्पण करण्यासाठी आज ते इथे आहेत. हा योगायोग आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.  

टॅग्स :एकनाथ शिंदेनरेंद्र मोदीमुंबई