Join us

'नारायण राणेंच्या जीवाला धोका, जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 16:40 IST

नारायण राणे हे जेवण करत असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. नारायण राणेचं जेवणाचं ताट पोलिसांनी ओढून घेतल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी माध्यमांना देणार आहे.

ठळक मुद्देनारायण राणे हे जेवण करत असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. नारायण राणेचं जेवणाचं ताट पोलिसांनी ओढून घेतल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी माध्यमांना देणार आहे.

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणेंना अटक झाल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. भाजपा नेतेही आक्रमक झाले असून भाजपा नेते प्रसाद लाड यांनी गंभीर आरोप केला आहे. 

नारायण राणे हे जेवण करत असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. नारायण राणेचं जेवणाचं ताट पोलिसांनी ओढून घेतल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी माध्यमांना देणार आहे. राणे सध्या आतमध्ये असून त्यांच्यापर्यंत कोणालाही जाऊ दिले जात नाही. त्यामुळे, नारायण राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. राणेंच्या अटकेनंतर भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. माजी मंत्री आणि भाजपा नेते डॉ. संजय कुटे यांनीही ठाकरे सरकारला लक्ष्य केलंय. दरम्यान, प्रसाद लाड यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्या व्हिडिओत नारायण राणे जेवण करत असताना पोलिसांसोबत तेथील कार्यकर्त्यांनी बाचाबाची झाल्याचे दिसून येते. नारायण राणेंच्या हातात जेवणाचे ताटही दिसून येत आहे.  

डॉ. संजय कुटेंची सरकारवर टीका

पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे यापेक्षा जास्त महाराष्ट्राचे दुर्दैवी काय असू शकते. पुन्हा बळाचा वापर केला जातोय, असे कुटे यांनी म्हटले आहे. तर, सुनिल देवधर यांनीही ट्विट करुन शिवसेनेचं हे तालिबानी रूप असल्याचं म्हटलंय. शर्जिल उस्मानी समोर शिवसेनेने गुढघे टेकून सपशेल शरणागती पत्करली आणि नारायण राणेंसमोर पुरुषार्थ दाखवते आहे, असे देवधर यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :नारायण राणे देवेंद्र फडणवीसप्रसाद लाडगुन्हेगारीभाजपा