Join us
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: 'योद्धा पुन्हा मैदानात', निलेश राणेंचं ट्विट; नारायण राणेंची आज रत्नागिरीत जनआशीर्वाद यात्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 10:00 IST

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लांजा शहर परिसरात सर्वच ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत.

मुंबई/रत्नागिरी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपाकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज रत्नागिरीत पार पडणार आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लांजा शहर परिसरात सर्वच ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण हे भाजपामय झाले आहे. याचदरम्यान नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी 'योद्धा पुन्हा मैदानात' असं म्हटलं आहे.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे यांची जनआशीर्वाद यात्रा २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता लांजा येथे येत आहे. यावेळी लांजा शहरात लांजा तालुका भाजपातर्फे नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात  येणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष महेश खामकर यांनी दिली. भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जाणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे पाहायला मिळाले, तर भाजपा नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभा राहिलेला दिसून आला.

'...तर राजकीय संन्यास घेईन'

जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जमाव बंदी लागू केल्याचा आरोपावर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, भाजपाने खोटे आरोप केले आहेत. याचे पुरावे सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे सामंत म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांना स्वायत: अधिकार आहेत ते प्रशासनाचे प्रमुख आहेत. जिल्हादंडाधिकारी देखील आहे, त्यामुळे त्यांना वाटले असेल की कलम १४४ सिंधुदुर्गमध्ये लावणे आवश्यक आहे. ते गणपतीच्या पार्श्वभूमीवर किंवा इतर कोणत्या पार्श्वभूमीवर असेल, असे उदय सामंत यांनी सांगितले

टॅग्स :नारायण राणे भाजपारत्नागिरी