Join us

"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; नारायण राणे म्हणाले, "त्यांनी काम घेतलं असेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 09:23 IST

राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नारायण राणेंनी भाष्य केलं.

Narayan Rane on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावरुन राजकारण रंगलं आहे. मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही, असं विधान अजित पवार यांनी इफ्तार पार्टीत केलं होतं. त्यांच्या या विधानावरुन विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनीही अजित पवारांच्या डोळे दाखवण्याच्या विधानावर भाष्य केलं आहे. अजित पवारांनी डोळे तपासण्याचा व्यवसाय सुरू केला वाटतं, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे. शुक्रवारी नरिमन पॉईंट येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह विविध नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना राज्यातील धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी भाष्य केलं. आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींना जो कोणी डोळे दाखवेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, असा इशारा त्यावेळी अजित पवार यांनी दिला होता.

अजित पवारांच्या या विधानावर नारायण राणे यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं.  पत्रकारांनी अजित पवारांनी दिलेल्या इशाऱ्याविषयी नारायण राणेंना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना, "काय माहिती नाही. अजित पवारांनी डोळे साफ करण्याचे काम घेतलं असेल. मला त्याविषयी माहिती नाही," असं नारायण राणे म्हणाले.

काय म्हणाले होते अजित पवार?

"आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींना जो कोणी डोळा दाखवेल, दोन गटात भांडण लावून कायदा व्यवस्था बिघडवणार आणि कायदा आपल्या हातात घ्यायची गोष्ट करणार, तो जो कोणी असेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. माफ केलं जाणार नाही," असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता.

दोषी आढळला तर त्याला सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"अजित पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही. कोणत्याही जाती किंवा धर्मातील चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला त्रास दिला आणि दोषी आढळला तर त्याला सोडले जाणार नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :नारायण राणे अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस