Narayan Rane: राणे पिता-पुत्रांना 6 तास पोलिस ठाण्यात ठेऊन विनाकारण त्रास, वकिलांनी केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 22:39 IST2022-03-05T18:45:13+5:302022-03-05T22:39:27+5:30
Narayan Rane: नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी वक्तव्य केलं होतं.

Narayan Rane: राणे पिता-पुत्रांना 6 तास पोलिस ठाण्यात ठेऊन विनाकारण त्रास, वकिलांनी केला आरोप
मुंबई - भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे 5 तासांपासून मालवणी पोलीस ठाण्यात हजर आहेत. दिशा सालियनप्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी ते पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. तब्बल 5 तासांपासून जबाब नोंदविण्यात येत असल्याने पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी मोठ गर्दी केली आहे. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी वक्तव्य केलं होतं. तर, नितेश राणे हेही ट्विटरवरुन सातत्याने दिशा सालियन प्रकरणावर भाष्य करत आहेत. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात दिशाच्या आई-वडिलांनी मालवणी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर एफआयर दाखल झाला होता. याप्रकरणात, मालवणी पोलिसांनी दहा मार्चपर्यंत या प्रकरणात नारायण राणे यांना अटक करू नये असे आदेश दिंडोशी न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता खुद्द नारायण राणे आणि नितेश राणे आज मालवणी पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत. पोलिसांसमोर आपली बाजू मांडत जबाब नोंदविण्यासाठी ते पोलीस ठाण्यात आले आहेत. नारायण राणे आणि नितेश राणे 5 तासांपासून मालवणी पोलीस ठाण्यात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. तर, 5 तासांपासून राणेंची चौकशी होत असल्याने कोणतीही पासपोर्ट पडताळणी आणि तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे, नागरिकांनीही पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
पोलीस विनाकारण त्रास देत आहेत : ऍड मानेशिंदे
सहा तासाहून अधीक काळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे. याबाबत 'लोकमत' ने त्यांचे वकील ऍड सतीश मानेशिंदे यांना विचारणा केली असता पोलीस विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चौकशी पूर्वीदेखील जवळपास अर्धा तास राणे पिता-पुत्रांना बाहेर बसविण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे राणे समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.