Join us
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: 'साहेब आज हवे होते..त्यांनी नक्कीच आशीर्वाद दिला असता', नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृती स्थळासमोर नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 13:41 IST

Narayan Rane: मुंबई विमानतळावरून सुरू झालेल्या यात्रेनंतर राणेंनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं.

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. मुंबई विमानतळावरून सुरू झालेल्या यात्रेनंतर राणेंनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. यानंतर राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. "साहेब आज हवे होते. ते असते तर त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद दिला असता आणि म्हणाले असते नारायण तू असाच पुढे जात राहा. साहेबांचा हात जरी आज माझ्या डोक्यावर नसला तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्यासोबत आहेत असं मी समजतो", असं नारायण राणे म्हणाले. 

नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना अभिवादन करू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच मुद्द्यावरुन राणेंनी शिवसेना नेत्यांना टोला लगावला. "स्मृतीस्थळ आणि स्मारकांवर कुणाला रोखण्याचा प्रकार कुणी करू नये. बाळासाहेब ही काही कुणाची खासगी मालमत्ता नव्हते. ते संपूर्ण राज्याचे आणि देशाचे नेते होते. त्यांच्याबद्दल प्रत्येकालाच खूप आदर आणि अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही. मुंबई पालिकेतील शिवसेनेचा पापाचा घडा आता भरलाय तो लवकरच फुटणार आहे आणि यंदा पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणारच", असं राणे म्हणाले. 

मुंबई मनपा जिंकणं ही माझी जबाबदारीमुंबई महानगरपालिका भाजपाच जिंकणार असून ती जिंकून देणं ही माझी जबाबदारी आहे. माझ्यासोबत प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांचीही ती जबाबदारी आहे. यावेळी पालिका निवडणुकीत तुम्ही भाजापाची सत्ता आलेला पाहाल, असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला. 

राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड यांच्यासह राणेंचे सुपुत्र निलेश राणे देखील उपस्थित आहेत. मुंबई विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचं स्वागत केल्यानंतर जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर प्रवीण दरेकर आणि शेलारांसह राणे मुंबईत शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादर परिसरात जनआशीर्वाद यात्रा करत आहेत. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :नारायण राणे भाजपामुंबईबाळासाहेब ठाकरे