Nanveet Rana: घरीच केली पूजा, राणा दाम्पत्याची आज माघार; मातोश्रीवर उद्या जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 11:55 IST2022-04-23T11:40:42+5:302022-04-23T11:55:13+5:30
शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले असून राणा दाम्पत्याच्या घराबाहेरही शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

Nanveet Rana: घरीच केली पूजा, राणा दाम्पत्याची आज माघार; मातोश्रीवर उद्या जाणार?
मुंबई - खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिकांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. आता सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने स्पष्ट केले होते. त्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले असून आज सकाळपासूनच राणा कुटुंबीयांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. येथे शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे. त्यानंतर, राणा दाम्पत्याने आज माघार घेतल्याचं समजत आहे.
शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले असून राणा दाम्पत्याच्या घराबाहेरही शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मातोश्रीबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यातच आता हिंमत असेल तर येऊन दाखवा, शिवसैनिक सज्ज आहेत, असे बॅनर मातोश्रीसमोर झळकले असून, शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. पोलिसांनी राणा दाम्पत्यास घराबाहेर पडू दिलं नाही. तर, त्यांच्य घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले असून आम्ही शनिवारचा महाप्रसाद देणारच, असेही ते म्हणत आहे. एकंदरीत या गोंधळानंतर राणा दाम्पत्याने आज माघार घेतली असून मातोश्रीवर उद्या जाणार असल्याचे म्हटल्याचे समजते.
युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतचा दुजोरा दिला आहे. यापूर्वीही त्यांनी मातोश्रीवर येणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आज ते घराबाहेरही निघू शकले नाहीत. आता, उद्या मातोश्रीवर येणार असल्याची घोषणा त्यांनी केल्याचं समजतंय, असे वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
मातोश्री आमच्यासाठीही देऊळ - राणा
शिवसैनिक आक्रमक झालेले असतानाच राणा दाम्पत्य यांनी फेसबुक लाईव्ह केलं आहे. यामध्ये सुरुवातीला राणा दाम्पत्य पूजा करताना दिसत होते. त्यानंतर रवी राणा यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच "'मातोश्री' हे आमच्यासाठीही देऊळ आहे. आम्ही देखील मंदिरात जाऊन हनुमान चालीसा वाचण्यासाठी निघालोय. पण आम्हाला थांबवलं आणि गुंडागर्दी करून आमच्या घरावर हल्ला होत आहे. पोलिसांना हाताशी धरून मुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत" असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.