Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या कॅबिनेटमध्ये संजय राऊत? गजानन कीर्तिकर, भावना गवळी यांचीही शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 12:30 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक उपसभापती व एक राज्यपाल पद अशी मागणी मोदी व शहा यांच्याकडे केल्याचे समजते.

ठळक मुद्देशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक उपसभापती व एक राज्यपाल पद अशी मागणी मोदी व शहा यांच्याकडे केल्याचे समजते. राज्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे विश्वासू व राज्यसभा खासदार अनिल देसाई व शिवसेनेतील एकमेव महिला असलेल्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या नावावर मातोश्रीतून शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.कॅबिनेट मंत्रीपदी गजानन कीर्तिकर व संजय राऊत यांची नावे आघाडीवर आहेत.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7 वाजता शपथविधी होत आहे. मंगळवारी सुमारे 5 तास मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात केंद्रातील मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. गुरुवारी पंतप्रधानांसह महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यांनंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित मंत्री व राज्य मंत्र्यांचा शपथविधी होईल असे समजते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक उपसभापती व एक राज्यपाल पद अशी मागणी मोदी व शहा यांच्याकडे केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे विश्वासू व राज्यसभा खासदार अनिल देसाई व शिवसेनेतील एकमेव महिला असलेल्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या नावावर मातोश्रीतून शिक्कामोर्तब झाल्याचे समजते तर येणारी आगामी विधानसभा लक्षात घेता व कोकणात शिवसेना मजबूत करून नारायण राणे यांना शह देण्यासाठी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचा राज्यमंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्री पदे मिळाल्यास शिवसेनेतील जेष्ठ सहकारी व उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील खासदार गजानन कीर्तिकर व मोदी यांच्या मावळत्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे संसदीय गटनेते व अनुभवी राज्यसभा खासदार संजय राऊत यांची वर्णी लागू शकते. जर मोदी यांनी शिवसेनेला एक कॅबिनेट दिल्यास कीर्तिकर व राऊत यांच्या पैकी एकाची वर्णी लागू शकते असे समजते. जर कीर्तिकर यांना कॅबिनेट दिल्यास संजय राऊत यांची लोकसभेच्या उपसभापती वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पत्रकारितेचा पिंड असलेले आणि जून 1992 पासून गेली 27 वर्षे सामना मुखपत्राची कार्यकारी संपादक पदाची यशस्वी धुरा संभाळणारे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना कार्यकारी संपादकपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

शिवसेनेला दोन कॅबिनेट मिळाल्यास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या मंत्री मंडळातील माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलींद देवरा यांना दक्षिण मुंबईतून पराभूत करणारे खासदार अरविंद सावंत यांची उपसभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.एकंदरीत गजानन कीर्तिकर, संजय राऊत, अनिल देसाई, भावना गवळी, अरविंद सावंत, विनायक राऊत बुलढाण्याचे  खासदार प्रताप जाधव या सात जणांची नावे जरी चर्चेत असलीशिवसेनेचे कोण कॅबिनेट व राज्यमंत्री मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात असतील याचा सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरेच घेणार यात शंका नाही.

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक निकालशिवसेनासंजय राऊतउद्धव ठाकरेगजानन कीर्तीकर