नालेसफाईची डेडलाईन संपली; पावसाळापूर्व कामे पूर्ण झाल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:30 IST2022-05-31T13:26:51+5:302022-05-31T13:30:01+5:30
महापालिका निवडणुकीमुळे यावर्षी नालेसफाईला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

नालेसफाईची डेडलाईन संपली; पावसाळापूर्व कामे पूर्ण झाल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा
मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून देशाच्या आर्थिक महानगरातील पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाचा मुद्दा आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत राहिला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने निश्चित केलेली ३१ मे रोजीची डेडलाइन मंगळवारी पूर्ण होत आहे. आतापर्यंत पावसाळापूर्व ९८ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नालेसफाईसह पाण्याच्या निचऱ्यासाठी जलटाक्यांची साठवण करणे, झाडांची छाटणी ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
महापालिका निवडणुकीमुळे यावर्षी नालेसफाईला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी यंदा महापालिकेने १३० कोटींचे टेंडर काढले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची कार्यवाही सुरू असून, ३० मेपर्यंत ९८ टक्के काम पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अनेक ठिकाणची कामे पूर्ण
पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीच्या काळात अंधेरी परिसरातील ‘मिलन सबवे’लगतच्या परिसरात पाण्याचा निचरा अत्यंत संथ गतीने होतो. यावर पर्यायी उपाययोजना म्हणून मिलन सबवेलगत असणाऱ्या एका भूखंडावर तब्बल दोन कोटी लिटर क्षमतेचे ‘साठवण जलाशय’ उभारले आहे.
गोरेगाव पश्चिम परिसरातील शास्त्री नगरमधील शास्त्रीनगर नाला येथील नालेसफाई झाली असून, नाल्यालगत संरक्षक भिंत कांदिवली पश्चिम परिसरातून वाहणाऱ्या पोईसर नदीलगत संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. पूर्व उपनगरांमधील एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस व टी विभागांमधील नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामध्ये पूर्व उपनगरांतील परिमंडळ- ५मध्ये ६९ मोठे नाले असून, परिमंडळ- ६मध्ये ४५ मोठे नाले आहेत, तर परिमंडळ- ५मध्ये ३६० छोटे नाले असून, परिमंडळ- ६ मध्ये ३३० छोटे नाले आहेत. याव्यतिरिक्त दोन्ही परिमंडळांमध्ये रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या व कल्व्हर्ट (मोरी)देखील आहे.
ही झाली कामे
पूर्व उपनगरातील मुलुंडमधील लालबहादूर शास्त्री मार्गावरील बाऊंड्री नाला, बॉम्बे ऑइल मिल नाला, अपना बाजारजवळील रेल्वे मार्ग खालून जाणाराभुयारी रस्ता, वालजी लढ्ढा रस्ता, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता रुंदीकरण अंतर्गत नाहूर रेल्वे स्थानकपार जाणारा पूल, विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील पूल, विद्याविहार स्थानकाजवळील पूल आदी ठिकाणची कामे पूर्ण झाल्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा दावा आहे.