नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:02 IST2025-12-04T11:00:12+5:302025-12-04T11:02:24+5:30
Nagpur Assembly Session 2025 News: नागपूर हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरला सुरु होणार आणि १४ डिसेंबरला अधिवेशनाचा समारोप होणार

नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून ते १४ डिसेंबरपर्यंतच चालेल. अधिवेशन सुरू झाल्यापासून सातव्या दिवशी म्हणजे अधिवेशनाचे सूप वाजेल. शनिवारी (दि. १३) आणि रविवारीही (दि. १४) कामकाज होईल.
राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहत असल्याने अधिवेशन आटोपते घेण्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे एकमत झाल्याचे दिसले. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे अनेकवेळा पुढे ढकलावी लागलेली विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक बुधवारी विधानभवनात पार पडली. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेतील कामकाजाचा कालावधी निश्चित करण्यात आला.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२५-२६ या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. राहुरीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल पहिल्याच दिवशी शोकप्रस्ताव मांडला जाईल. याशिवाय सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रस्ताव तसेच महत्त्वाची विधेयके अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्यात येतील.
फडणवीस यांचे भाषण पुस्तक रूपात
भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या ऐतिहासिक पर्वानिमित्त २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत चर्चा झाली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि. स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी दिली.
बैठकीला यांची उपस्थिती
बैठकीला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अमीन पटेल, विधान परिषद सदस्य अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते जाहीर करा
सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि विधिमंडळाच्या नियमात विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, अशी तरतूद आहे. येत्या अधिवेशनात दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद जाहीर करावे, अशी मागणी उद्धवसेनेचे नेते आ. भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केली.