माझी ‘भिंत’ही संत ज्ञानेश्वरांच्या परंपरेची वाहक - राज्यपाल कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 02:06 AM2020-11-10T02:06:08+5:302020-11-10T06:59:02+5:30

लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या माझी ‘भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनच्या जलविहार सभागृहात शानदार समारंभात झाले.

My 'wall' is the bearer of the tradition of Saint Dnyaneshwar - Governor Koshyari | माझी ‘भिंत’ही संत ज्ञानेश्वरांच्या परंपरेची वाहक - राज्यपाल कोश्यारी

माझी ‘भिंत’ही संत ज्ञानेश्वरांच्या परंपरेची वाहक - राज्यपाल कोश्यारी

Next

मुंबई :  महाराष्ट्रात आठ शतकांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी योग सामर्थ्याने भिंत चालवल्याचा उल्लेख आहे. समाज माध्यमांच्या आजच्या युगात राजेंद्र दर्डा यांनी देखील आपली आभासी भिंत यापुढेही चालू ठेवावी. त्यांचे माझी ‘भिंत’ हे पुस्तक संतांच्या परंपरेचे वाहक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी येथे केले. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या माझी ‘भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनच्या जलविहार सभागृहात शानदार समारंभात झाले. त्यावेळी कोश्यारी बोलत होते. 

यावेळी सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील प्रमुख पाहुणे होते. लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा आणि पुस्तकाचे लेखक राजेंद्र दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते. राजकीय नेते, उद्योगपती, ज्येष्ठ आयएएस, आयपीएस अधिकारी, डॉक्टर्स आणि समाजाच्या विविध स्तरांतील मान्यवरांची दिमाखदार उपस्थिती या प्रकाशन समारंभाला लाभली. राजेंद्र दर्डा यांच्या फेसबुक पेजवरील नोंदी, निरीक्षणे, स्फुट लेख, कविता व अभिप्राय यांचे संकलन या पुस्तकात आहे. 

या प्रसंगी राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्र ही ज्ञानदानाची भूमी आहे. या भूमीत सर्वसमावेशकता आहे. संत ज्ञानेश्वरांनी एकेकाळी भिंत चालविली, रेड्याकडून वेद वदवून घेतले. आपल्याजवळ असलेली सकारात्मक ऊर्जा समाजाला परत देण्याची भूमिका घेणे ही येथील परंपरा आहे. त्याच परंपरेचे प्रतीक म्हणजे राजेंद्र दर्डा यांचे माझी ‘भिंत’ हे पुस्तक आहे.

सुंदर मराठी भाषेतून लिहिलेल्या आपल्या पुस्तकामध्ये राजेंद्र दर्डा यांनी अधून मधून हिंदी भाषेतील पक्तींची चवदार फोडणी दिल्यामुळे माझी ‘भिंत’ हे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे; ‘यह सोने पे सुहागा है’ असे गौरवोद्गार राज्यपालांनी काढले. प्रख्यात कवि दुष्यंतकुमार यांच्या काव्यपंक्तींचा संदर्भ आज देशभरातील नेते संसदेत बोलताना देतात. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना समाजात सकारात्मकता पेरण्यासाठी या पुस्तकातील अनेक संदर्भाचा उपयोग करता येऊ शकेल. एवढेच नव्हे तर आबालवृद्धांसाठी ते प्रेरणादायी ठरेल, असेही राज्यपाल म्हणाले.  लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी आभार प्रदर्शन केले.  सूत्रसंचालन लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी केले. 

मान्यवरांची समारंभाला उपस्थिती

राजभवनातील या प्रकाशन समारंभाला मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई महापालिका आयुक्त आय.एस.चहल, इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गोयंका, उपलोकायुक्त संजय भाटिया, पोलिस सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलिस सह आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विनय चौबे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतुक) यशस्वी यादव, अतिरिक्त पोलिस आयुक्त दक्षिण मुंबई सत्यनारायण, अतिरिक्त आयुक्त पश्चिम विभाग संदीप कर्णिक, माहिती जनसंपर्क विभागाचे सचिव व महासंचालक दिलीप पांढरपट्टे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्षप राजीव जलोटा, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, अमृता फडणवीस, आ. अमर राजूरकर, भाजप नेते किरीट भन्साली, माजी पोलिस अधिकारी पी.के.जैन, सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त रॉबिन सिंग, सहाय्यक अधीक्षक सुधीर यादव, युगांडाचे काऊसिंल जनरल मधुसुदन अगरवाल, रमेश अगरवाल, रवांडाचे काऊंसिल जनरल प्रकाश जैन, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, ब्राईट आऊटडोअर्सचे रमेश लखानी, लायन्स इंटरनॅशनलचे राजू मनवानी, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड आणि त्यांच्या पत्नी सुनाली राठोड, प्रख्यात डॉक्टर प्रतित समदानी, शाह असोसिएटसचे जयेंद्र शाह आदी उपस्थित होते. 

ही भिंत समाजातील ती भिंत पाडेल : अशोक चव्हाण
n कोरोनामुळे आज माणसामाणसांच्या भेटी दुरापास्त झाल्या आहेत. सर्वच व्यवहारांमध्ये एक प्रकारची अदृश्य भिंत तयार झाली आहे. दुसरीकडे समाजात विद्वेषाच्या नकारात्मकतेच्या भिंती उभ्या राहत आहेत. मात्र, राजेंद्र दर्डा यांनी माझी ‘भिंत’ या पुस्तकात मांडलेली भूमिका, विचार हे नकारात्मकतेच्या या भिंती पाडून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. चव्हाण-दर्डा परिवाराच्या स्नेहपूर्ण संबंधांना उजाळा देऊन ते म्हणाले की, एक चिकित्सक पर्यटक, प्रगल्भ राजकीय नेतृत्व, संवेदनशील व्यक्ती म्हणून राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेले हे पुस्तक त्यांचे व्यक्तिमत्व सांगणारेही आहे. त्यांनी आजवर टीआरपीच्या भानगडीत न पडता निष्पक्ष, सकारात्मक पत्रकारिता केली.  त्याच नजरेतून साकारलेले हे पुस्तक आहे. स्वर्गीय बाबूजींच्या तालमीत ते तयार झाले. राजकारणात असूनही त्यांनी जीवनाचा आनंद घेताना जे अनुभवले ते वाचकांनाही दिले. 

ही तर वणवा विझवणारी भिंत : विजय दर्डा 

लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा प्रास्ताविकात म्हणाले की, आमचे बाबूजी जवाहरलाल दर्डा यांनी मला व माझे बंधू राजेंद्र यांना एक संस्कार दिला. ‘तुम्ही लोकमतचे वाचक हे लोकमतचे मालक आहेत आणि तुम्ही वाचकांचे विश्वस्त म्हणून काम बघायचे असा तो संस्कार होता. त्या मार्गानेच आम्ही काम केले. ४० वर्षांच्या राजकारण समाजकारणात राजेंद्र यांनी कधी कोणता डाग लागू दिला नाही. ते माझे बंधू असल्याचा मला अभिमान आहे. समाजमाध्यमाचा वापर हा नकारात्मक आणि सकारात्मक असा दोन्ही पद्धतीने करता येतो. हे माध्यम राक्षसही आहे आणि समाजातील द्वेषाचा वणवा विझवूदेखील शकते. माझ्या भावाने सकारात्मकतेची पेरणी करण्यासाठी त्याचा सदुपयोग केला. माझी ‘भिंत’ या पुस्तकाने स्नेह जुळविण्याचे आणि प्रेम वाटण्याचे काम केले आहे. 

माझे बंधू राजेंद्र यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. समस्येला संधी समजत त्यांनी काम केले. लक्ष्य निश्चित केले आणि ते पूर्णही केले. देशविदेशातील शिक्षण त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून पूर्ण केले. देशविदेशातील अनुभवांनी समृद्ध झालेली भिंत त्यांनी वाचकांसमोर आणली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्याशी असलेल्या विशेष स्नेहाचा विजय दर्डा यांनी आवर्जून उल्लेख केला. राज्यसभेत आम्ही एकाचवेळी सदस्य होतो आणि ते आमच्या संसदीय समितीचे अध्यक्ष होते, असे ते म्हणाले. 

राज्यपालांशी गुफ्तगु झाली : अशोक चव्हाण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य शासन यांच्यातील ताणलेल्या संबंधांबाबत काही टिप्पणी आजच्या समारंभात होईल का या बाबत उत्सुकता होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, या समारंभाच्या निमित्ताने राज्यपालांशी बोलण्याची संधी मिळाली. राज्यपालांशी काही बोलणे झाले,‘गुफ्तगु’ झाली पण काय बोलणे झाले ते मी इथे सांगणार नाही’ राज्यपाल कोश्यारी आणि लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांच्यातील स्नेहपूर्ण संबंधांचा उल्लेख दोघांनीही भाषणात केला. तो धागा पकडून जयंत पाटील हसत म्हणाले की, राज्यातील सरकार चालविताना दिल्लीतून आम्हाला प्रफुल्लभाई पटेल यांची मदत होते. त्याच प्रमाणे राज्यात आता राज्यपालांकडील प्रश्न सोडविण्यासाठी विजयबाबूंची मदत व्हावी.  


जगाची सफर घडविणारे पुस्तक : जयंत पाटील

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, राजेंद्र दर्डा यांनी देशविदेशात फिरून नोंदविलेली निरीक्षणे माझी ‘भिंत’ या पुस्तकात आहेत. एका अर्थाने हे जगाची सफर घडविणारे पुस्तक आहे. लोकमत आणि दर्डा परिवाराशी माझ्या वडिलांपासून कौटुंबिक संबंध आहेत. जगाच्या पाठीवर जे चांगले दिसले आणि त्यातून जो चांगला विचार आला तो पुस्तकात आहे. फेसबुक वॉलने आज सर्वांनाच लिहिते केले आहे पण जे लिहिले ते पुस्तकरुपाने आणण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. राजेंद्र दर्डा अतिशय हुशार व प्रश्नांची जाण असणारे नेते आहेत. त्यांचे माझी ‘भिंत‘ हे पुस्तक जग न फिरलेल्यांना जगभ्रमंतीचा आनंद देणारे पुस्तक आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. देशातील सर्वोत्तम वृत्तपत्र म्हणून लोकमतने आज ओळख निर्माण केली आहे. दर्डा परिवारातील तिसरी पिढीही आज सक्षमपणे तीच परंपरा चालवित आहे असे कौतुकही त्यांनी केले. 

माझी ‘भिंत’ पुस्तक घराघरात जावे : बाळासाहेब थोरात

समाजमाध्यम हे दुधारी शस्त्र आहे पण त्याचा चांगला वापर कसा केला जाऊ शकतो याचे माझी ‘भिंत’हे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. जीवनाचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले राजेंद्र दर्डा यांनी आपल्याला जे वाटले, दिसले ते समाजासमोर या पुस्तकाच्या निमित्ताने मांडले आहे. त्यात त्यांचे कविमनही दिसते. आम्ही खूप वर्षे एकत्र काम केले, राजेंद्रबाबू कविमनाचे आहेत पण ते उत्तम कवीही आहेत हे पुस्तक वाचून कळले. हे पुस्तक घराघरात जायला हवे. मनापासून अन् झोकून देत काम करण्याची त्यांची वृत्ती लोकमतमध्ये तर दिसतेच पण सहकारी आमदार, मंत्री म्हणूनही मी ती अनुभवली आहे. कायमचा स्मरणात राहील असा आजचा समारंभ आहे, असेही थोरात म्हणाले. 

फेसबुकच्या भिंतीवर जेव्हा लिहिली जाते दिल की बात... राजेंद्र दर्डा यांचे मनोगत

एक जमाना वह भी था 
जब दीवारों पर लिखते थे इन्कलाब 
एक जमाना यह भी है,
दीवारों पर होती है दिल की बात ... 
असं जाहीर करत लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या फेसबुकवरील भिंतीचं अंतरंग आज राजभवनात मान्यवरांच्या साक्षीने उलगडून दाखवलं. ‘माझी भिंत’ या अनोख्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने हा योग जुळून आला. एरवी द्वेष, दुरावा आणि आकसाला कारण ठरणाऱ्या समाजमाध्यमाचा उपयोग मनं जोडण्यासाठी, हरवलेले दुवे सांधण्यासाठी आणि आयुष्याच्या वाटचालीत जमवलेलं संचित वाटण्यासाठी केला तर याच भिंतीवर स्नेहाचे किती सुंदर मळे फुलवता येतात; याचा अनुभव मी यानिमित्ताने घेतला, असं दर्डा यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केलं. या पुस्तकातील काही स्वरचित कवितांच्या संवेदनशील ओळी त्यांनी वाचून दाखविल्या तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.  चार दशकांहून अधिक काळ लोकमतसारख्या मुख्य माध्यम प्रवाहातील अग्रणी वृत्तपत्राचं सारथ्य करत असताना चार वर्षांपूर्वी केवळ नवं जग समजून घेण्याच्या उत्सुकतेपायी ऑनलाईन कट्ट्यावर  आलेले राजेंद्र दर्डा यांनी अल्पावधीतच फेसबुकवर अक्षरश: हजारो चाहत्यांचं कुटुंब जोडलं. या कुटुंबाशी झालेल्या गुजगोष्टींना जुन्या आठवणींची अस्तरं आहेत आणि समकालीन घटनांवरच्या मतप्रदर्शनाचे टाकेही आहेत 

प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि सामाजिक जीवन लाभलेले दर्डा यानी आपल्या समृद्ध अनुभवविश्वाची दारं या पुस्तकाच्या निमित्ताने उघडली आहेत. कोरोना महामारीमुळे सगळं जग घरात कोंडलं गेलेलं असताना राजेंद्र दर्डा यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका कवितेने अनेकांच्या मनावरचं निराशेचं मळभ दूर केलं होतं. ते लिहितात,
सगळं थांबलं आहे, संपलेलं नाही,
माणूस हताश आहे, हरलेला नाही !
आपण धावत होतो, ठेच तेवढी लागली आहे,
चला, रक्ताळलेला अंगठा बांधून घ्या,
उद्याची सकाळ आपलीच आहे! 

Web Title: My 'wall' is the bearer of the tradition of Saint Dnyaneshwar - Governor Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app