Join us  

माझा पक्षच 'पितृपक्ष', उद्धव ठाकरेंनी सांगितला पितृ पंधरवड्याचा बोगसपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 8:46 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी भाषा विभागातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देहे सगळं भोंदूगिरी आहे, माझे आजोबा नास्तिक होते का, अजिबात नाही. त्यांची देवीवरती प्रचंड श्रद्धा होती. पण, हे जे ढोंग आहे त्यावर लाथ मार, या ढोंगावरती लाथ मारली पाहिजे, त्यांनी ते फक्त लिहून सोडून दिलं नाही

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. तसेच, यावेळी पितृपक्ष पंधरवाडाबाबतही आपण अंधश्रद्धा पाळत नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मी काही साहित्यिक नाही, संत तुकाराम महाराजांच्या पोथ्या बुडवल्या होत्या, त्या परत वर आल्या. मी तोच क्षण आज अनुभवतोय. कारण, आमच्यासाठी याच पोथ्या आहेत, या पोथ्या मी वाचल्या नसल्या तरी आमच्या रक्तात त्या आलेल्याच आहेत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी भाषा विभागातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, प्रबोधन नियतकालिकातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांच्या संग्रह ग्रंथाचे प्रकाशन आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण झाले. याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरेंनी पितृ पंधरवड्याबद्दलही स्पष्ट मत व्यक्त केलं. पितृपक्ष चांगला की वाईट, पितृपक्षात चांगलं काम काही करू नये, मला जेव्हा विचारतात की अमूक अमूक गोष्ट करायचीय करू की नको, मी विचारलं का? तेव्हा पितृपक्षय.. असे उत्तर आले. त्यावर, अहो माझा पक्षच पितृपक्ष आहे, वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.   

हे सगळं भोंदूगिरी आहे, माझे आजोबा नास्तिक होते का, अजिबात नाही. त्यांची देवीवरती प्रचंड श्रद्धा होती. पण, हे जे ढोंग आहे त्यावर लाथ मार, या ढोंगावरती लाथ मारली पाहिजे, त्यांनी ते फक्त लिहून सोडून दिलं नाही. एका फुटबॉलपटूप्रमाणे जिथं ढोंग दिसलं, तिथ त्यांनी लाथा मारल्या. एकाकी माणूस असतानाही त्यांनी पेरलेल्या विचारांची बीजे आज एवढी फोफावली आहेत, तीच आपण सर्वजण पाहतोय. माझ्या आजीची इच्छा होती की, त्यांच्या मुलाने सरकारी नोकदार व्हावं, पण बाळासाहेबांनी काय केलं हे जगासमोर आहे. तसेच, नातू तर तुमच्यासमोर आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.  प्रबोधनकार कडक शिस्तीचे होते. पूर्वीच्या काळातील वाईट चालीरितींविरोधात ते ठामपणे उभे राहिले. प्रबोधनकारांचे ग्रंथ साहित्य देशातील सर्व राज्यांत पोहोचण्यासाठी त्याचे भाषांतर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनमधील लेखांच्या संग्रह ग्रंथाच्या प्रकाशनावेळी केले. तसेच, शिवसेना प्रमुखांच्या स्मारकातही मला प्रबोधनकार पाहिजे आहेत, त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत, असे ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेहिंदूभाजपाबाळासाहेब ठाकरे