Join us  

'केवळ विधानपरिषदेसाठी माझे नाव चर्चेत, दुसऱ्या कोणत्याही चर्चेत तथ्य नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 10:14 AM

राष्ट्रवादीकडून सध्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपालाताई चाकणकर, अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले अमोल मिटकरी यांची नावे चर्चेत आहेत.

मुंबई - राज्यातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यासाठी, सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवाराची यादी निश्चित करण्यात येत आहे. भाजपाने आपल्या चारही उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांनी आपले अर्जही दाखल केले आहेत. त्यामुळे, आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून कोणाची निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादीकडून सध्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपालाताई चाकणकर, अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले अमोल मिटकरी यांची नावे चर्चेत आहेत. तर, खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध निवडणुकीत राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद लावणारे शशिकांत शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे. याबद्दल खुद्द शशिकांत शिंदेंनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिलीय. ''एका वर्तमानपत्रात विधानपरिषद निवडीसोबत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडी बाबतच्या चर्चेची बातमी आलेली आहे, प्रदेशाध्यक्ष निवडी बाबतच्या बातमीत कोणतेही तथ्य नसून फक्त विधानपरिषद निवडी संदर्भात माझे नाव चर्चेत आहे. दुसरी कोणत्याही प्रकारची चर्चा सध्य परिस्थितीत नाही'', असे म्हणत विधानपरिषदेच्या नावासाठी चर्चा सुरु असल्यावर शिंदे यांनी शिक्कामोर्तब केलंय. मात्र, प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाची चर्चा तथ्यहिन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय

 

सध्याच्या समीकरणांनुसार शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, काँग्रेसचा एक असे मिळून महाविकास आघाडीचे ५ आणि भाजपाचे तीन आमदार थेट निवडून येऊ शकतात. मात्र, नवव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. भाजपानं चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं आता चूरस निर्माण होणार आहे. तर आता काँग्रेसनेही दुसरा उमेदवार विधान परिषदेच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी केली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

आठवलेंनाही हवीय विधानपरिषद, रिपाइंला जागा न सोडल्याने कार्यकर्ते नाराज

भाजपानं विधान परिषद नाकारली; पंकजा मुंडे मध्यरात्री ट्विट करून म्हणाल्या...

 

 

टॅग्स :आमदारशशिकांत शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईविधान परिषद निवडणूक