'सिद्धिविनायकाची सेवा करण्याची माझी ४० वर्षांपासूनची इच्छा'; सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 08:02 PM2023-11-07T20:02:25+5:302023-11-07T20:05:01+5:30

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सदा सरवणकर बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले.

'My desire for 40 years to serve Siddhivinayak Temple'; MLA Sada Saravankar's reaction | 'सिद्धिविनायकाची सेवा करण्याची माझी ४० वर्षांपासूनची इच्छा'; सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया

'सिद्धिविनायकाची सेवा करण्याची माझी ४० वर्षांपासूनची इच्छा'; सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांना हटवून सदा सरवणकर यांना न्यासाचं अध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. 

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सदा सरवणकर बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले. यावेळी त्यांचे चिरंजीव समाधान सरवणकर आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे ह्या देखील उपस्थित होत्या. यावेळी आमदार सदा सरवणकर म्हणाले की, सिद्धिविनायकाची सेवा करावी अशी माझी ४० वर्षांपासून इच्छा होती. पण ती पूर्ण होत नव्हती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जबाबदारी दिली, अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली. 

सिद्धिविनाय मंदीराच्या कामाबाबतही सदा सरवणकर यांनी आपलं मत व्यक्त केले. दिवसेंदिवस भक्तांचा ओघ वाढतोय, पण सुविधांकडे लक्ष दिलं जात नव्हतं. अनेक वर्षापासून येणारे भाविक आहेत. त्यांची सुरक्षितता ढिसाळ दिसतेय. वाहतूक व्यवस्था आहे, त्याच्यात बदल करण्याची गरज आहे. अपुऱ्या राहिलेल्या कामाची पूर्तता करण्याचा माझा कल असेल, असं सदा सरवणकर यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंची टीका-

सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले, असा निशाणा आदित्य ठाकरेंनी ट्विटद्वारे साधला.

हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती. अटक व्हायला हवी होती, पण... ह्या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय. मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता. पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.

Web Title: 'My desire for 40 years to serve Siddhivinayak Temple'; MLA Sada Saravankar's reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.