भाजपच्या 'त्या' टोळीनेच माझा घात केला; सरवणकरांचा आरोप, अमित साटम म्हणाले, "माध्यमांसमोर चर्चा नको"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 10:21 IST2026-01-21T10:20:40+5:302026-01-21T10:21:05+5:30

पराभवानंतर समाधान सरवणकरांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

My defeat was due to the betrayal of local BJP leaders alleges Samadhan Sarvankar Ameet Satam responds | भाजपच्या 'त्या' टोळीनेच माझा घात केला; सरवणकरांचा आरोप, अमित साटम म्हणाले, "माध्यमांसमोर चर्चा नको"

भाजपच्या 'त्या' टोळीनेच माझा घात केला; सरवणकरांचा आरोप, अमित साटम म्हणाले, "माध्यमांसमोर चर्चा नको"

Samadhan Sarvankar: महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. प्रभादेवी-वरळी बालेकिल्ल्यातील शिंदेसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवासाठी भाजपच्या एका स्थानिक टोळीला जबाबदार धरले आहे. हा पराभव जनतेने दिलेला कौल नसून, मित्रपक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या टोळीमुळे पराभूत झालो," अशा जळजळीत शब्दांत सरवणकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर दिल्लीत बोलताना मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली.

प्रभाग क्रमांक १९४ मधून अवघ्या ५०० मतांनी पराभूत झालेले समाधान सरवणकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला. त्यांच्या मते, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सॲप मेसेज पाठवून "सरवणकरांना मदत करू नका" असे स्पष्ट आदेश दिले होते. वरच्या पातळीवरून हा आदेश आल्याचे भासवून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आली, ज्यामुळे हक्काची मते विभागली गेली, असं सरवणकर यांनी म्हटलं.

'ही केवळ महापालिकेपुरती मर्यादित टोळी नाही'
सरवणकर यांनी हा प्रकार केवळ आपल्या प्रभागापुरता मर्यादित नसल्याचे सांगितले. हीच भाजपची टोळी लोकसभा निवडणुकीत शीतल गंभीर यांना पाडण्यासाठी प्रयत्नशील होती. ही मंडळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याबद्दलही अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन भाष्य करतात. या टोळीने पैसे घेऊन स्वतःच्याच युतीमधील उमेदवारांना पाडण्याचे कंत्राट घेतल्याचा खळबळजनक आरोप सरवणकरांनी केला आहे.

"उद्धव ठाकरे स्वतः बूथवर फिरत होते, दोन्ही युवराजांच्या सभा झाल्या, ४-५ आमदार तळ ठोकून होते; इतकी मोठी ताकद विरोधात असतानाही मतदारांनी मला भरभरून साथ दिली. पण युतीधर्माला हरताळ फासणाऱ्या भाजपच्या स्थानिक गद्दारीमुळे माझा विजय थोडक्यात हुकला," असे सरवणकर म्हणाले. समाधान सरवणकर यांनी या सर्व प्रकाराचे व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप्स गोळा केल्या असून, ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.

अमित साटम यांची सावध भूमिका

समाधान सरवणकर यांच्या या आरोपांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "समाधान सरवणकर फार कमी मतांनी पराभूत झाले आहेत. त्यांनी काही विषयांवर चिंता व्यक्त केली आहे. त्याबाबत काय सत्यता आहे हे तपासून पाहू. त्यांच्याकडून आणि इतर व्यक्तींकडूनही याबाबत माहिती घेऊ. त्याचा विचार करुन आम्ही निर्णय घेऊ. त्यांनी भाजपवर कुठलाही आक्षेप नोंदवलेला नाही. त्यांनी काही लोकांवर आक्षेप घेतला आहे. अशा गोष्टींची एकमेकांसोबत चर्चा केल्याने त्या चांगल्या पद्धतीने सुटू शकतात. माध्यमांसमोर या गोष्टी बोलणं टाळलं पाहिजे," असं अमित साटम म्हणाले.
 

Web Title : सरवणकर ने भाजपा गुट पर लगाया आरोप; साटम ने आंतरिक चर्चा का आग्रह किया।

Web Summary : समाधान सरवणकर ने भाजपा के एक गुट पर उनकी उम्मीदवारी को sabotaging करके हार का कारण बनने का आरोप लगाया। अमित साटम ने सार्वजनिक बयानों के बजाय आंतरिक चर्चा की वकालत की।

Web Title : Sarvankar accuses BJP faction of sabotage; Satam urges internal discussion.

Web Summary : Samadhan Sarvankar alleges a BJP faction caused his defeat by sabotaging his campaign. He plans to present evidence to leaders. Amit Satam advocates for internal discussion rather than public statements.