Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालाडमध्ये वृद्धेची हत्या, चोरीच्या उद्देशाने घटना घडल्याचा संशय, अज्ञातावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 15:30 IST

तक्रारदार राजेश शिंदे (३१) याच्या फिर्यादीनुसार, शांताबाई ही मालाड पश्चिमच्या सुभाष डे चाळीत राहायची आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून मिळणाऱ्या पैशांतून ती उपजीविका करायची.

मुंबई : मालाडमध्ये ८९ वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. शांताबाई कुऱ्हाडे असे मृताचे नाव आहे. चोरीच्या उद्देशातून हा गुन्हा घडल्याचा संशय असून, या प्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार राजेश शिंदे (३१) याच्या फिर्यादीनुसार, शांताबाई ही मालाड पश्चिमच्या सुभाष डे चाळीत राहायची आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून मिळणाऱ्या पैशांतून ती उपजीविका करायची. तिने १६ मे रोजी राजेशचा लहान भाऊ सोनू याला फोन केला. झोपड्याचे भाडे भरले असून, १५ हजार रुपये शिल्लक असल्याचे सांगितले. शनिवारी घरी ये आणि भाविकांनी दिलेले रेशन घेऊन जा, असेही तिने सांगितले. त्यानंतर राजेशच्या आईने आई शांताबाई हिला फोन केला; मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. चिंता वाटू लागल्याने तिने आजीला बघून ये, असे राजेशला सांगितले. 

आईच्या सांगण्यावरून राजेश १७ मे रोजी सकाळी १० वाजता आजीच्या घरी गेला असता दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्याने दरवाजाच्या फटीतून पाहिले असता आजी जमिनीवर पडलेली दिसली. त्याने त्वरित घरमालकाच्या मदतीने घराचा पत्रा बाजूला करून दरवाज्याची कडी उघडली. आजीच्या चेहऱ्यावर, छातीवर तसेच हाताला जखमा होत्या. तिला तत्काळ रुग्णालयात नेले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

छातीला फ्रॅक्चर  -  शवविच्छेदन अहवालात छातीला फ्रॅक्चर, चेहऱ्याला जखम झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता घराचा पत्रा उचकटून चोर घरात शिरले असतील. -   विरोध केल्याने चोरांच्या हल्ल्यात शांताबाईचा मृत्यू झाल्याचा संशय असून, त्यानुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस