काळाचौकीत भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:ही त्याच चाकूने संपविले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:20 IST2025-10-25T09:19:26+5:302025-10-25T09:20:00+5:30
दहा वर्षांचे प्रेमसंबंध तुटल्याने प्रियकराचे संतापाने कृत्य

काळाचौकीत भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:ही त्याच चाकूने संपविले आयुष्य
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहा वर्षांचे प्रेमसंबंध तुटल्यानंतर प्रियकराने संतापाने प्रेयसीवर दिवसाढवळ्या भररस्त्यात चाकूने वार केले. यावेळी बचावासाठी तिने नर्सिंग होममध्ये धाव घेतली. परंतु, त्यानंतरही न थांबता त्याने तिथे जाऊन तिच्यावर वार केले. परिसरातील नागरिकांनी लाठी, पेव्हर ब्लॉक हल्लेखोर प्रियकराच्या दिशेने फेकून तिची सुटका करत बाहेर काढले. तोपर्यंत त्यानेही स्वतःवर वार करत आयुष्य संपविले. काळाचौकी येथील दिग्विजय मिलजवळ ही थरारक घटना शुक्रवारी घडली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीची उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज संपली. सोनू बराय (२४) व मनीषा यादव (२४), अशी मृतांची नावे आहेत. दोघेही आंबेवाडी परिसरात राहायचे. सोनू केटरिंगचे काम करत होता. गेल्या ८ ते १० वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, सोनू तिच्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. याच रागातून मनीषाने नाते तोडण्याचा निर्णय घेतला.
८ ते १० दिवसांपूर्वी त्यांचे नाते संपुष्टात आले होते. यामुळे सोनू संतप्त होता. त्याने शुक्रवारी मनीषाला भेटण्यासाठी बोलावले. चाकू सोबत घेऊनच तो या भेटीसाठी आला. सकाळी अकराच्या सुमारास दोघे एकत्र भेटले. परिसरात दोन राउंड मारल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पुढे निघालेल्या मनीषावर त्याने अचानक चाकूने वार करण्यास सुरुवात केल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी मृत सोनूविरोधात हत्येचा व त्याने केलेल्या आत्महत्येबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिची मृत्यूशी झुंजही संपली
वाहतूक पोलिस आणि तरुणांनी मनीषाला टॅक्सीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग रुग्णालय, तर सोनूला केईएम रुग्णालयात दाखल केले. दाखल कारण्यापूर्वीच पोलिसांनी सोनूला मृत घोषित केले. मनीषाला पुढील उपचारांसाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी उपचारादरम्यान मनीषाचा मृत्यू झाला.
वाहतूक पोलिस शिपाई धावला... मनीषाला सोडवलेही, पण...
भायखळा वाहतूक विभागाच्या ग्रुपवर एमटीपी हेल्पलाइनवरून काळाचौकी येथे दुचाकी व चारचाकी वाहने फूटपाथवर पार्किंग असून येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास होत आहे, असा कॉल प्राप्त झाला. ते ऐकून भायखळा वाहतूक विभागाचे रायडर शिपाई किरण सूर्यवंशी हे रवाना झाले. या ठिकाणी ते कारवाई करत असताना काही लोकांनी त्यांना सांगितले की, आस्था नर्सिंग होमच्या केबिनमध्ये एक तरुण एका तरुणीला चाकूने मारहाण करत आहे. सूर्यवंशी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पीडित तरुणीला (मनीषा) आरोपीच्या ताब्यातून प्रयत्न करून सोडवले. तिला नर्सिंग होमच्या बाहेर काढले. क्षणाचाही विलंब न करता तिला टॅक्सीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. या ठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार झाले. काळाचौकीचे अधिकारी व अंमलदार यांनी पुढील उपचाराकरिता मनीषाला जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केले.