महापालिकेच्या शाळा लवकरच टोलेजंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:59 IST2025-10-05T08:58:55+5:302025-10-05T08:59:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पालिकेने ४ शाळांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरण आखले आहे. त्यानुसार दहा मजल्यांच्या इमारती उभारण्यात येणार ...

महापालिकेच्या शाळा लवकरच टोलेजंग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेने ४ शाळांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरण आखले आहे. त्यानुसार दहा मजल्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत. यात अत्याधुनिक वर्ग व अन्य सुविधा, तर वरच्या मजल्यावर सभागृह, कौशल्य कक्ष आणि अंतर्गत खेळांसाठी सुविधा असणार आहेत.
सध्या मुंबई पालिकेच्या शाळा चार ते पाच मजल्यांच्या आहेत. त्यापैकी बऱ्याच इमारती जीर्ण झाल्यात आहेत. त्यामुळे शालेय इमारतींचा पुनर्विकास अत्याधुनिक पद्धतीने करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सुरुवातीला कुलाबा, जुहू येथील गांधीग्राम, माहीम साईबाबा पथ या शाळांच्या इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. नव्या इमारती या आठ ते दहा मजल्यांच्या असतील. सहाव्या मजल्यापर्यंत वर्ग, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय या सुविधा असतील. तळमजल्यावर मानसिक, विशेष विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जातील. याशिवाय बालवाडीचे वर्गही तळमजल्यावर भरविण्यात येणार आहेत. सातपासून पुढील मजल्यांवर विविध कार्यक्रमांसाठी सभागृह कक्ष, कार्यशाळा कक्षासह इतर सुविधांसाठी नियोजन करण्यात येणार आहे.
प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही बसवणार
पालिकेच्या शाळा या पायाभूत सुविधा कक्षामार्फत बांधल्या जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. आपत्कालीन परिस्थितीत सुटका घेण्यासाठी तेवढा विभाग रिकामा ठेवण्यात येणार आहे.
सीसीटीव्हीच्या देखभालीसाठी स्वतंत्र कक्ष असेल, अशी माहिती शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये शिकवली जातील. त्यामुळे पालिका शाळेत येणाऱ्या विशेष करून गरीब घटकातील विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.