Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:35 IST

Municipal Election 2026: लोकमतच्या यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या निवडणुकीत भाजपापेक्षा अधिक चांगला स्ट्राईक रेट राहिल्यास शिंदेसेना महापौरपदावर दावा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता श्रीकांत शिंदे यांनी महायुती ही कुठल्याही पदासाठी झालेली नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मुंबईमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेची महायुती विरुद्ध उद्धवसेना आणि मनसे या ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या युतीमध्ये मुख्य लढत होत आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपासोबतच शिंदेसेनाही संपूर्ण ताकदीने उतरली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरपदाबाबत श्रीकांत शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

लोकमतच्या यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या निवडणुकीत भाजपापेक्षा अधिक चांगला स्ट्राईक रेट राहिल्यास शिंदेसेना महापौरपदावर दावा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता श्रीकांत शिंदे म्हणाले की, महायुती ही कुठल्याही पदासाठी झालेली नाही. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा ते स्वत: मंत्री होते. त्यावेळी मंत्रिपद सोडून त्यांनी उठाव केला. तेव्हा पुढे जाऊन सरकार बनेल की, मुख्यमंत्री बनतील हे माहिती नव्हते.

कुठलं पद मिळेल, किंवा महानगरपालिकेमध्ये शिंदेसेनेचा महापौर बनेल, हा विचार नाही आहे. महायुतीचा महापौर बसला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळे लोक काम करत आहोत. किती जागा मिळतील, भाजपा आणि शिंदेसेनेच्या जेवढ्या जागा येतील त्यात पूर्ण बहुमताने महायुतीचा महापौर मुंबईमध्ये बसणार आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी कल्याण डोंबिवलीत शिंदेसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेली कुरघोडी आणि रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदांबाबत श्रीकांत शिंदे म्हणाले की, माझं कुणाशी वैर नाही आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही युतीच्या माध्यमातून लढत आहोत. तर उल्हासनगरमध्ये एकमेकांविरोधात लढत आहोत. काही ठिकाणी युती होते, काही ठिकाणी होत नाही, शिंदेसेनेकडून कधीही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला जात नाही. माझं प्रत्येक वक्तव्य हे युती व्हावी या मताचं आहे. काही लोकांना आपला पक्ष मोठा व्हावा असे वाटत असेल. त्यात ते आता प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचा मतदारसंघ डोंबिवली आहे, त्यामुळे ते लक्ष घालत असतील, असेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shrikant Shinde: Sena will claim Mumbai mayor post if strike rate is better?

Web Summary : Shrikant Shinde stated that the alliance aims to install a mayor in Mumbai, regardless of individual party performance. The focus is on securing a majority and working together, not on specific positions. He also addressed disagreements within the alliance in Kalyan-Dombivli.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६श्रीकांत शिंदेरविंद्र चव्हाणशिवसेनाभाजपा