कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 05:38 IST2026-01-09T05:38:50+5:302026-01-09T05:38:50+5:30
मुंबईसह महामुंबईतील ९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/ठाणे: मुंबईसह महामुंबईतील ९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचारसभांनी निवडणुकीत रंगत वाढली आहे. मुंबईत १,७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडून ६० लाख २२ हजारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जमा झाली आहे. महामुंबईतील ९ महापालिकांच्या तिजोरीत त्यातून २ कोटी ६२ लाख ६३ हजार ५०० रुपये जमा झाले आहेत. उमेदवाराला एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते मिळाल्यास त्यांचे डिपॉझिट जप्त केले जाते. त्यामुळे पालिका निवडणुकीत किती जणांचे उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, ते निकालानंतर कळेल.
ठाणे पालिकेत २६ लाख १५ हजार रुपये जमा झाले आहेत. मुंबईत ११ हजार ३९१ उमेदवारी अर्जाचे वितरण झाले. त्यातून ११ लाख ३९ हजार इतका महसूल मिळाला. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध असल्यास आणि नाकारला गेल्यास डिपॉझिट परत मिळते. निवडून आलेल्या उमेदवारालाही डिपॉझिट परत मिळते. मतदानाच्या प्रारंभापूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीस डिपॉझिट परत केले जाते. तर वसई विरारमध्ये अर्ज विक्रीतून तिजोरीत ३ लाख २२ हजार ४०० रुपये जमा झाले. ५४७ उमेदवारांच्या अनामत रकमेपोटी ३२ लाख ८२ हजार ५०० रुपये मिळाले.
कोणाला किती डिपॉझिट?
खुला गट ५,०००
महिला, आरक्षित गट २,५००
लोकसभेला किती?
लोकसभा निवडणुकीत २५ हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते. आरक्षित गटासाठी १२,५०० तर विधानसभा निवडणुकीत खुल्या गटासाठी १० हजार, प्रवर्गासाठी ५ हजार अनामत रक्कम आहे.
मुंबई : १,७०० उमेदवार : ६० लाख २२ रु
ठाणे : ६४९ उमेदवार : २६ लाख १५ रु.
केडीएमसी : ८६० उमेदवार : ३३ लाख रु.
भिवंडी : १,०३३ उमेदवार : २९ लाख ३० रु.
उल्हासनगर : ४३२ उमेदवार : १८ लाख ४७ हजार रु.
नवी मुंबई : ४९९ उमेदवार : ३२ लाख ८२ हजार ५०० रु.
पनवेल : २४६ उमेदवार : १० लाख २२ हजार ५०० रु.
मिरा-भाईंदर : ४३५ उमेदवार : १९ लाख ६२ हजार रु.
वसई-विरार : ५४७ उमेदवार : ३२ लाख ८२ हजार ५०० रु.