BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:57 IST2026-01-15T10:56:31+5:302026-01-15T10:57:37+5:30
BMC Election 2026 voting Day: महापालिका निवडणुकीत शाईऐवजी मार्करचा वापर. मुंबई आयुक्तांनी मान्य केली शाई पुसली जात असल्याची बाब. निवडणूक आयोगाचा २०१२ पासूनचा नियम काय? वाचा.

BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र, मतदानाच्या पहिल्या काही तासांपासूनच अनेक मतदान केंद्रांवरून एक विचित्र तक्रार समोर येत आहे. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी निळी शाई ही पारंपारिक शाई नसून 'मार्कर पेन' आहे आणि विशेष म्हणजे हा मार्कर लावल्यानंतर काही वेळातच पुसला जात आहे. या प्रकारामुळे बोगस मतदानाची भीती व्यक्त केली जात असून राजकीय वातावरण तापले आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत महत्त्वाची माहिती दिली आहे. "बोटावर मार्कर वापरताना नखावरील शाई पुसली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत, हे सत्य आहे," अशी कबुली आयुक्तांनी दिली आहे. मात्र, हे मार्कर कीट महापालिका प्रशासनाने स्वतः तयार केलेले नसून ते राज्य निवडणूक आयोगाकडून पुरवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाचे म्हणजे हा मार्कर २०१२ पासून राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत (नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद) वापरला जात आहे. पारंपारिक शाईच्या बाटल्या हाताळण्यापेक्षा मार्कर वापरणे सोपे आणि सुटसुटीत असल्याने हा बदल करण्यात आला होता. मार्करची शाई पूर्णपणे सुकण्याआधी पुसली तर ती निघू शकते, त्यामुळे मतदारांनी ती सुकेपर्यंत हात लावू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
विरोधकांचा संशय
दरम्यान, मनसे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी या मार्करच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "जर शाई पुसली जात असेल तर एकच व्यक्ती पुन्हा मतदान करू शकते, हे लोकशाहीसाठी घातक आहे," अशी भूमिका उमेदवारांनी घेतली आहे.
मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी आज मार्कर पेन वापरलं जातंय, ती शाई सहज पुसली जातेय… शिवसैनिक, महाराष्ट्रसैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की सतर्क रहा, शाई पुसली जाण्याचा कोणी गैरफायदा घेत नाही ना ह्याकडे लक्ष द्या! गाफिल राहू नका!
- साईनाथ दुर्गे, ठाकरे सेना, सचिव