“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:41 IST2025-12-20T19:38:34+5:302025-12-20T19:41:07+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न दिसत आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नुकतीच दोन दिवस सविस्तर चर्चा झालेली आहे. राज्यातील २८८ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुका व २८ महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसदर्भात चर्चा करण्यात आली आहे. आमचा लढा वैचारिक असून राज्यातील भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेस पक्ष लढा देत आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न दिसत आहे. भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे, महाराष्ट्र विकण्याचे काम सुरु आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी, नेते उपस्थित होते. राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस पक्षाने निवणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरु असून जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत विजयी करेल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा प्रचंड वापर केला जात आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात आघाडी आहे. भाजपा महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नाही. शेतकरी, बेरोजगारी, महिला, कायदा सुव्यवस्था याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत विजयी करेल, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे तशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मुंबई वगळता इतर ठिकाणी समविचारी पक्षांशी चर्चा सुरू आहे पण जेथे आवश्यकता आहे तेथे भाजप महायुती सोडून इतर समविचारी पक्षांशी आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. राज्यातील प्रमुख नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची विभागवार जबाबदारी दिलेली आहे, रणनिती ठरवणे, प्रचार यात ते सक्रीय आहेत, असेही चेन्नीथला यांनी सांगितले.