आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 06:28 IST2026-01-10T06:28:00+5:302026-01-10T06:28:00+5:30
निवडणुकीपूर्वी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. कदाचित या सर्वांचा परिणाम म्हणून सध्या तरी कलाकारांनी प्रचारापासून दूर राहणे पसंत केले असावे, असा अंदाज चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणुकांमध्ये अनेक उमेदवारांकडून प्रचारासाठी कलाकारांना पसंती दिली जाते. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ‘आम्ही नाही जाणार प्रचाराला!’ असे म्हणत कलाकार प्रचाराकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेता भरत जाधववर चित्रीत झालेला मनसेचा व्हिडिओ आकर्षणाचे केंद्र बनला आहे. याबाबत भरत म्हणाला की, व्हिडिओमध्ये मराठी माणसांची टक्केवारी कशी कमी झाली ते दाखवण्यात आले असून, ती आकडेवारी खरी आहे. प्रचाराबाबत बोलायचे तर कोणत्या कलाकाराने कोणाच्या प्रचाराला जावे हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत आहे. तर आदेश बांदेकर म्हणाले की, मी सध्या पूर्ण ताकदीनिशी प्रचार करत आहे. तर मराठी सिनेसृष्टीत स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, रिंकू राजगुरू, अमृता खानविलकर, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, प्राजक्ता माळी यांना डिमांड आहे. पण ते कोणाचा प्रचार करणार ते सध्या गुपितच आहे. स्वप्नील आणि अमृताचे नवीन नाटक आल्याने ते दौऱ्यावर आहेत.
२०१७ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या अभिनेत्री निशा परुळेकर-बांगेरा हिला भाजपने प्रभाग क्रमांक २५ मधून तिकिट दिले आहे. निशाच्या प्रचारासाठी तिच्या मित्र परिवारातील काही कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
यामुळे फिरवली पाठ
निवडणुकीपूर्वी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अशात बिनविरोध निवडणुकीच्या फॉर्म्युल्याने सर्वांनाच धक्का दिला. कदाचित या सर्वांचा परिणाम म्हणून सध्या तरी कलाकारांनी प्रचारापासून दूर राहणे पसंत केले असावे, असा अंदाज चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
दोन दिवस महत्त्वाचे...
१२ आणि १३ जानेवारी हे प्रचाराचे शेवटचे दोन दिवस असल्याने प्रचाराची गणिते बदलू शकतात आणि काही कलाकार संबंध जपण्यासाठी किंवा आणखी काही कारणांमुळे प्रचाराच्या रणधुमाळीत सामील होऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षांकडील कलाकारांची फौज
मनसेकडे महेश मांजरेकर, अभिजीत पानसे, तेजस्विनी पंडित, विनय येडेकर, सचिन खेडेकर, पुष्कर श्रोत्री, अजित भुरे, सायली संजीव, संजय नार्वेकर अशी कलाकारांची फौज आहे.
शिंदेसेनेकडेही प्रसाद ओक, मंगेश देसाई, प्रवीण तरडे यांच्यासह सुशांत शेलार, विजू माने, हार्दिक जोशी, विजय निकम हे कलाकार आहेत. तर भाजपकडे प्रिया बेर्डे, विजय पाटकर, मेघा धाडे, प्रथमेश परब, अरुण नलावडे, समीर दीक्षित आदी रंगकर्मी आहेत.
राष्ट्रवादी (अजित पवार)कडे मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, शिरीष राणे, गार्गी फुले, चंद्रकांत विसपुते आदी कलाकार आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार)कडे डाॅ. अमोल कोल्हे आहेत.
कलाकार मित्रमंडळी मनसेसोबत आहेत. त्यापैकी काही प्रचारासाठी मैदानात उतरली, पण सध्या तरी आम्ही कोणाच्या नावाची घोषणा केली नाही. - अमेय खोपकर, अध्यक्ष, मनसे चित्रपट सेना