Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 06:44 IST

निवडून आल्यानंतर आमदार, महापौर, नगरसेवकांना तुम्ही किती काम केले हे मी विचारणार नाही. तर किती लाडक्या बहिणींना लखपती बनवले ते विचारणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या पंचवीस वर्षांत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केलेले एक तरी ठोस विकासकाम दाखवावे, मी त्यांना तीन हजार रुपये देईन, अशा खोचक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका केली. अंधेरी आणि चेंबूर येथे त्यांची प्रचारसभा झाली. मराठीचा मुद्दा मांडणाऱ्या उद्धव यांच्या काळात मुंबईकर मुंबईबाहेर का गेला, असा सवालही त्यांनी केला.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी काम करत असून झोपडीधारकाला मालकीचे घर देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. बीडीडी चाळीतील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे दिली, तर पत्राचाळीतील मराठी कुटुंबांना २० वर्षांनंतर न्याय मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेल्या एसआरए योजना मार्गी लावल्या असून चुकार बिल्डरांचे एलओआय रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ज्यांनी विकासकामांपासून वंचित ठेवले, त्यांना फेका 

वसई-विरार : वसई-विरारचा सर्वाधिक विकास आतापर्यंत व्हायला हवा होता; पण तो झाला नाही. ज्यांनी आपल्याला विकासकामांपासून वंचित ठेवले; त्यांना आता उखडून फेकायचे आहे आणि सामान्य जनतेचे राज्य आणायचे आहे. मागच्या विधानसभेत तुम्ही क्रांतिकारी परिवर्तन करून दिले. आता आम्ही तुमचे परिवर्तन करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपाऱ्यात केली.

लखपती दीदी किती केल्या ते विचारणार 

मीरा रोड : निवडून आल्यानंतर आमदार, महापौर, नगरसेवकांना तुम्ही किती काम केले हे मी विचारणार नाही. तर किती लाडक्या बहिणींना लखपती बनवले ते विचारणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाईंदर येथील भाजपच्या प्रचार सभेत शुक्रवारी केले. शहरातील विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार व  बांधण्यासाठी गरज पडल्यास निधीही देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis challenges Thackeray to show development work, offers reward.

Web Summary : Fadnavis criticized Thackeray for lack of Mumbai development, promising rewards for proof. He highlighted housing initiatives, SRA progress, and vowed development in Vasai-Virar. Fadnavis also pledged support for women entrepreneurs and community buildings.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६नगर पालिकामुंबई महापालिका निवडणूक २०२६वसई विरार महानगरपालिका निवडणूक २०२६मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६देवेंद्र फडणवीसमहायुतीभाजपा