मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 07:29 IST2025-11-14T07:29:30+5:302025-11-14T07:29:58+5:30
Mumbra Train Accident: मुंब्रा येथील रेल्वे अपघात प्रकरणातील समर यादव आणि विशाल डाेळस या दाेन अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. त्यामुळे या अभियंत्यांना काेणत्याही क्षणी रेल्वे पाेलिसांकडून अटक हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
ठाणे - मुंब्रा येथील रेल्वे अपघात प्रकरणातील समर यादव आणि विशाल डाेळस या दाेन अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. त्यामुळे या अभियंत्यांना काेणत्याही क्षणी रेल्वे पाेलिसांकडून अटक हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या आदेशाला आपण मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आराेपीचे वकील बलदेवसिंह राजपूत यांनी सांगितले.
मुंब्रा, दिवा या अप आणि डाऊन मार्गांवर ९ जून राेजी झालेल्या अपघाताच्या वेळी कसारा ते सीएसएमटी अप आणि सीएमएमटी ते कर्जत या दाेन्ही उपनगरी रेल्वेतून नऊ प्रवासी खाली पडले हाेते. यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले हाेते. अपघाताची रेल्वेच्या दाेन अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरूद्ध सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा तब्बल पाच महिन्यांनी १ नाेव्हेंबर राेजी दाखल झाला. ट्रॅक जवळ येणे, खडी निसटणे, ट्रॅकवरील वेल्डिंग ५ जूनला न हाेणे आदी तांत्रिक मुद्यांवर व्हीजेटीआयने अहवालातून ठपका ठेवला हाेता. रेल्वे पाेलिसांनीही आराेपींकडे चाैकशीसाठी त्यांच्या अटकेची मागणी केली. त्यावर अटी, शर्तींवर जामीन मंजूर करण्याची मागणी केली हाेती. ४ नाेव्हेंबर राेजी या अभियंत्यांनी केलेल्या जामीन अर्जावर ११ नाेव्हेंबर राेजी सुनावणी झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश गणेश पवार यांच्यासमोर सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील राजपूत यांनी काही सीसीटीव्ही चित्रीकरण सादर केले होते.