मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:07 IST2026-01-02T18:07:06+5:302026-01-02T18:07:54+5:30
मराठी व्होटबँक आमची आहे. मराठी माणसांनी भाजपाला मतदान केले नसते तर सलग ३ निवडणुकीत आमचे १५ आमदार निवडून येतायेत असं त्यांनी सांगितले.

मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
मुंबई - मागील काही दिवसांपासून भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी महापौरपदावरून केलेल्या विधानामुळे भाजपाची कोंडी झाली. मीरा भाईंदर शहरात एका कार्यक्रमात इतके नगरसेवक निवडून आणू ज्यातून उत्तर भारतीय महापौर बसेल असं विधान केले. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कृपाशंकर सिंह यांनी केलेले विधान मीरा भाईंदरमध्ये होते, ते मुंबईत म्हणाले नाही. मात्र ते विधान मुंबईशी जोडून दाखवण्यात आले. मूळात ते आमचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? त्यांनी जे विधान केले ते मीरा भाईंदरचं काढले आणि तुम्ही मुंबईत दाखवले. तुम्ही फार हुशार आहात असं पत्रकारांना सांगत मी या पक्षाचा नेता म्हणून सांगतोय, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठी होईल असं अधिकृतपणे सांगतो असं त्यांनी स्पष्ट केले.
तसेच मराठी व्होटबँक आमची आहे. मराठी माणसांनी भाजपाला मतदान केले नसते तर सलग ३ निवडणुकीत आमचे १५ आमदार निवडून येतायेत. दुसरे कुणाचे आले नाहीत. कुणीही दावा करू द्या. भाजपाच नंबर वन राहिला आहे. सगळ्या मराठी भागात आम्ही निवडून येतो. त्यामुळे आमचा मराठी आहे, अमराठी आहे आणि सगळेच आमचे आहेत. मुंबईतलं मराठीपण कुणी घालवू शकत नाही. कुणी कुठूनही आले तरी मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे. या शहरात व्यवसायासाठी लोक येतात. पूर्वी मजूर यायचे आता मुंबई तंत्रज्ञानाचे क्षेत्र आहे, आर्थिक सेंटर आहे त्यासाठी लोक बाहेरून येतात. परंतु त्यामुळे मुंबईचं मुंबईपण कुणी घालवू शकत नाही. सगळे लोक गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. मुंबईच्या संस्कृती आणि तिची वाटचाल याबाबत कुठेही तडजोड होणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, आम्ही घराणेशाही केलीच नाही. परंतु काही ठिकाणी आमची धोरणात्मक युती होती तिथे तो प्रश्न आला. पुण्यात शरद पवारांचे आमदार धोरणात्मक आमच्यासोबत आले. त्यात त्यांनी एक प्रभाग सोडा, तिथे त्यांच्या मुलाला आम्ही भाजपाकडून संधी दिली. जे उमेदवार त्यांनी ठरवले ते दिले. गावच्या ठिकाणी सगळे एकमेकांचे नातेवाईकच आहे. आम्ही खासदार, आमदारांच्या मुलांना तिकीट दिले नाही. नार्वेकरांच्या बाबत बोलायचे तर त्याठिकाणी आमचे सीटिंग नगरसेवक होते आणि दुसऱ्या ठिकाणी रणनीती म्हणून आम्ही उमेदवारी दिली. बाकी कुठेही आम्ही घराणेशाही केली नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं.