मुंबईतील फटाका मार्केट दिवाळीसाठी सज्ज; व्यवसायाला कोरोनाचा फटका; मागणीत झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 03:44 AM2020-11-01T03:44:57+5:302020-11-01T03:45:19+5:30

fire cracker : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच पगार कपातही झाली आहे. यामुळे मुंबईतील बऱ्याच कुटुंबांमध्ये दिवाळीच्या तोंडावर पैशांची चणचण भासू लागली आहे.

Mumbai's firecracker market ready for Diwali; Corona's blow to business; There was a decline in demand | मुंबईतील फटाका मार्केट दिवाळीसाठी सज्ज; व्यवसायाला कोरोनाचा फटका; मागणीत झाली घट

मुंबईतील फटाका मार्केट दिवाळीसाठी सज्ज; व्यवसायाला कोरोनाचा फटका; मागणीत झाली घट

Next

- ओमकार गावंड

मुंबई : यंदाची दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्यासाठी मुंबईतील विविध फटाका मार्केटमध्ये फटाके दाखल झाले आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत फटाक्यांच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे फटाक्यांच्या होलसेल दुकानात दरवर्षीच्या तुलनेत ५० टक्केच फटाक्यांचा माल भरला असल्याचे दुकानदारांचे मत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच पगार कपातही झाली आहे. यामुळे मुंबईतील बऱ्याच कुटुंबांमध्ये दिवाळीच्या तोंडावर पैशांची चणचण भासू लागली आहे. यंदा फटाक्यांचे भाव देखील १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे फटाक्यांच्या दुकानांकडे ग्राहकांनी काही प्रमाणात पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. 
पब्जी बॉम्ब, टिकटॉक क्रॅकर्स, जमीन चक्कर, रेनबो फाउंटन, म्युझिक चक्कर, बटरफ्लाय, स्काय व्हिसल रॉकेट, ड्रोन शॉट, टी ट्वेण्टी क्रॅकर्स अशा प्रकारचे नवीन फटाके यंदा बाजारात उपलब्ध झाले आहेत. यंदा बाजारात भारतीय बनावटीच्या फटाक्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १० रुपये एक बॉक्स ते ३ हजार रुपये एक बॉक्स अशा दरात अनेक फटाके बाजारात उपलब्ध झाले आहेत. फटाक्यांच्या होलसेल दुकानामध्ये दिवाळीच्या काळात दिवसाला ५० ते ६० लाखांची उलाढाल होते. 

दर वर्षी दिवाळीच्या दोन आठवडे अगोदरच ग्राहक फटाक्यांची खरेदी करतात. यंदा अनेकांचा दिवाळी बोनस झाला नाही. त्याचप्रमाणे पैशांची अडचण लक्षात घेता ग्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील दिवाळीच्या काळात ग्राहक फटाके खरेदी करतील अशी आम्हाला आशा आहे.
    - सुमित विचारे, 
    फटाक्यांचे रिटेल दुकानदार, चेंबूर

यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दसरा हे सण साधेपणाने साजरे झाल्यामुळे त्याकाळात फटाक्यांची विक्री झाली नाही. कोरोनाचा विळखा सैल होत असल्याने दिवाळीत फटाक्यांची चांगल्या प्रकारे विक्री होईल अशी आम्हाला आशा आहे. तेदेखील यंदा फटाके व्यापाराला ५० टक्क्यांनी फटका बसेल असे गृहीत धरून आम्ही व्यवसाय करत आहोत.
    - सागीर अक्रम, 
    फटाक्यांचे होलसेल व्यापारी, कुर्ला

Web Title: Mumbai's firecracker market ready for Diwali; Corona's blow to business; There was a decline in demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.