मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध; जल निर्मलता पुरस्कारानं पालिकेचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 05:11 PM2021-03-07T17:11:05+5:302021-03-07T17:11:46+5:30

सन २०१९- २० या वर्षाकरिता सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून बृहन्मुंबई महापालिकेला जल निर्मलता पुरस्कार  देण्यात आलेला आहे.

Mumbais drinking water is 99 percent pure Municipal Corporation honored with Jal Nirmalta Award | मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध; जल निर्मलता पुरस्कारानं पालिकेचा सन्मान

मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध; जल निर्मलता पुरस्कारानं पालिकेचा सन्मान

Next

१ लाख ७५ हजार ठिकाणचे गळतीचे स्त्रोत शोधून करण्यात आली दुरुस्ती

मुंबई : भारतातील नामांकित अशा 'इंडियन वॉटर वर्क्स' असोसिएशनतर्फे दरवर्षी "जल निर्मलता" या विषयात राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार विशेषतः नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा क्षेत्रातील तंत्रज्ञान, कुशल प्रशासन आणि उच्च प्रतिच्या व्यवस्थापनातून  पाण्याचा दर्जा सुधारून पाणीपुरवठा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात येतो.

सन २०१९- २० या वर्षाकरिता सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून बृहन्मुंबई महापालिकेला जल निर्मलता पुरस्कार  देण्यात आलेला आहे. उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोरे यांनी हा पुरस्कार हैदराबाद येथे नुकत्याच एका विशेष कार्यक्रमात स्वीकारला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात मागील काही वर्षापासून बृहन्मुंबई क्षेत्रातील पाणीपुरवठयात  अमुलाग्र बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्याद्वारे जल विभागाने सुधारणा केलेल्या  आहेत.

पंतप्रधान जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत  ग्राहक व्यवहार मंत्रालय, यांच्यातर्फे देशातील २१ शहरामध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करून आयएस  १०५००: २०१२ नुसार पाण्याच्या विविध ४७ मानकांकरिता तपासण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर भागातील वरळी, करी रोड, शिवडी; पश्चिम उपनगरातील मालाड, कांदिवली, जोगेश्वरी; तसेच पूर्व उपनगरातील पवई, साकीनाका , घाटकोपर, चेंबूर येथील झोपडपट्टीच्या भागातून पाण्याचे नमुने गोळा करून तपासण्यात आले. त्यातील सर्व नमुने ४७ मानकांकरीता योग्य  आढळले आहेत.

बृहन्मुंबई महापालिकेतर्फे दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याच्या  पुरवठा  नागरिकांना केला जातो. त्यातून सेवा जलाशय व जलवितरण व्यवस्थेत निवडक ३५८ ठिकाणे पालिकेच्या जल विभागाने पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी निश्चित केलेली आहेत. त्यापैकी  आरोग्य खाते व गुणनियंत्रण (जलकामे) विभागाकडून दैनंदिनी ११० ते १३० ठिकाणाहून पाण्याचे नमुने गोळा करून आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील प्रयोगशाळेत 'मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक' (एम .एफ. टी) या अद्यावत व अचूक तंत्रज्ञानाने डब्ल्यू, एच. ओ मानांकनानुसार तपासले जातात .दादर येथील प्रयोगशाळेला माहे डिसेंबर २०२० मध्ये नॅशनल बोर्ड ऑफ लेबोरेटरीज (N.A.B.L) चे नामांकन प्राप्त झालेले आहे.

 सन २०१३- १४ ते सन २०१९- २० या कालावधीत मुंबई महापालिकेतर्फे जुन्या जीर्ण झालेल्या विविध व्यासाच्या २५० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या बदलण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यांचे पुनर्स्थापनही करण्यात आले आहे.

यासोबतच १ लाख  ७५ हजार  ठिकाणच्या गळती शोधून दुरूस्ती करण्यात आलेल्या आहेत. विविध ठिकाणी कामे सुरू असताना रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत ८९,९०८ सेवा जोडण्या बदलण्यात आल्या.  सन २०१२ ते २०१८ पर्यंत विविध जलद बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात आले. जल अभियंता विभागातर्फे मागील पाच वर्षात करण्यात आलेल्या अशा विविध उपाययोजनांमुळे सन २०१९-२० या  कालावधीत पाण्याच्या  दर्जात्मक आणि शुद्धतेत ९९.३४ टक्‍क्‍यापर्यंत वाढ झालेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने आपली सेवा देताना मुंबईकरांना गुणात्मकता व गुणवत्ता दोन्ही क्षेत्रात अव्वल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठ्याचा प्रयत्न नियमितपणे करत आहे.

Web Title: Mumbais drinking water is 99 percent pure Municipal Corporation honored with Jal Nirmalta Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.