मुंबईकरांचा आज फैसला; कौल एकतर्फी की अटीतटीचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:56 AM2019-05-23T00:56:52+5:302019-05-23T00:57:37+5:30

मुंबई : युती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्येच थेट लढत असल्याचे चित्र प्रचारादरम्यान पाहायला मिळाले होते. २०१४ प्रमाणे यंदाही एकतर्फी कौल ...

Mumbai's decision today; Kaul Ekaterifi's condition? | मुंबईकरांचा आज फैसला; कौल एकतर्फी की अटीतटीचा?

मुंबईकरांचा आज फैसला; कौल एकतर्फी की अटीतटीचा?

googlenewsNext

मुंबई : युती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्येच थेट लढत असल्याचे चित्र प्रचारादरम्यान पाहायला मिळाले होते. २०१४ प्रमाणे यंदाही एकतर्फी कौल मिळणार की विजयातील मतांचे अंतर घसरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विजयातील अंतर घसरल्यास प्रकाश आंबेडकरांमुळे वंचित बहुजन आघाडीकडे वळलेली मते आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपविरोधी भूमिका घेत केलेला प्रचार मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्यास कारणीभूत ठरणार, याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.


प्रचारादरम्यान युती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली. चार वर्षे सुरू असलेली धुसफुस संपवून एकदिलाने काम करण्याची कसरत युतीच्या नेत्यांना करावी लागली. स्थानिक पातळीवरील नाराजी दूर करण्यात बहुतांश ठिकाणी युतीला यश आले होते. उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात तर विद्यमान खासदार किरीट सोमय्यांचे तिकीट कापण्यात आले. तरीही, स्थानिक शिवसैनिकांनी असहकार पुकारण्यात आल्याची चर्चा सुरूच होती. सत्तेत सहभागी असूनही शिवसेना मोदी आणि भाजपवर निशाणा साधते यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. मात्र, मोदींना पंतप्रधान करायचे असेल तर मतभेद विसरून सहकारी पक्षासाठी काम करण्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती.


सहाच महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघातून दगाफटका झाल्यास विधानसभेच्या तिकिटावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आमदारांनी कोणताच धोका पत्करला नाही. मोदींसाठी भाजपची मते शिवसेना उमेदवारांकडे वळली. मराठी पट्ट्यात मात्र काही ठिकाणी चलबिचल पाहायला मिळाली. शिवसेनेने चार वर्षे तोंडसुख घेत मोदी-शहांची भाजप गुजरातधार्जिणी असल्याची भावना निर्माण केली होती. शिवसेनेने रंगवलेले हे चित्र ऐनवेळी राज ठाकरे यांच्यासाठी साहाय्यकच ठरले. त्यावर राज यांनी आपल्या खास शैलीत फटकारे मारले. त्यामुळे मराठी मतदार काय भूमिका वठवितो, हेही आजच्या निकालाने स्पष्ट होणार आहे.


ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईचा अध्यक्ष बदलण्याची नामुश्की काँग्रेसवर ओढवली होती. मुंबई काँग्रेसमधील गटबाजी निवडणूक जाहीर होईपर्यंत सुरूच होती. त्यामुळे ऐनवेळी संजय निरुपम यांच्याकडील कारभार मिलिंंद देवरा यांच्याकडे सोपविण्यात आला. ऐनवेळी झालेल्या संघटनात्मक बदलाचे परिणाम मतदानापर्यंत जाणवत राहिले. निरुपम यांच्या हकालपट्टीमुळे बाजूला पडलेले नेते, कार्यकर्ते काही प्रमाणात सक्रिय होतील असा अंदाज होता. मात्र, एकसंध पक्षाऐवजी व्यक्तिगत संबंधच महत्त्वाचे ठरले. त्यामुळे शेवटपर्यंत बहुतांश उमेदवारांना एकाकीच झुंज द्यावी लागली. ऐनवेळी राहुल गांधींसह जवळपास सर्वच केंद्रीय नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरविल्याने मुंबईतील काँग्रेस उमेदवार मेटाकुटीला आले होते.


मनसे फॅक्टर आणि ओसरलेल्या मोदी लाटेचा आम्हालाच फायदा होणार, असा दावा आघाडीचे नेते करीत आहेत. मुंबईतील लढती एकतर्फी ठरतील, ही युतीच्या नेत्यांची अपेक्षा प्रचारादरम्यान फोल ठरली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तर अटीतटीची लढत असल्याचे जाणवल्याचा दावा आघाडीकडून होत आहे. २००९ प्रमाणेच विजयाचे अंतर घसरणार आणि त्याचा आम्हाला फायदा होणार, असा अंदाज आघाडीकडून वर्तविण्यात येत आहे. युतीच्या नेत्यांनी मात्र २०१४ प्रमाणेच सहाही जागी आमचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.


गेल्या वेळी मोदी लाटेमुळे मुंबईतील मतांचा टक्का वाढला होता. त्यात यंदा भरच पडली. त्यामुळे मोदी लाट ओसरल्याचा आघाडीचा दावा निराधार आहे. राज ठाकरे यांच्या सभांची चर्चा झाली असली तरी त्याचे मतांमध्ये परिवर्तन होणार नाही. मनसेचा मूळ मतदार हा प्रामुख्याने काँग्रेसविरोधी राहिला आहे. राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे अर्धवट माहितीवर आधारित होते. काँग्रेस, राष्ट्रवादीचा अजेंडा राबविण्यासाठीच राज ठाकरे बेछूट आरोप करीत होते, याची मतदाराला पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे मनसेचे इंजीन यंदाही फेल जाणार आणि त्यांच्या भरोशावर असलेल्या आघाडीचा मुखभंग होणार, असा दावा युतीकडून केला जात आहे.


मागील दोन लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी एकतर्फी कल दिला होता. २००९ साली मुंबईतील सहाही जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. मनसेच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारसंघात लाखभर मते घेत युतीचे गणित बिघडवले होते. तर, २०१४ साली सहाही जागा युतीच्या खात्यात जमा झाल्या. मोदी लाटेमुळे विजयी उमेदवारांचे मताधिक्य एक ते साडेचार लाख इतके राहिले. मुंबईतील सहाही जागांवर आघाडीच्या उमेदवारांना सपाटून मार खावा लागला होता. लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांत एकतर्फी निकाल देण्याची मुंबईची परंपरा यंदाही कायम राहील की त्याला ब्रेक मिळणार याबाबत उत्सुकता आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या भूमिकेला मतदार राजा साथ देतो की नाही यावर मनसेचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. तर, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला मुंबईकर कसा प्रतिसाद देतात, तेही आज स्पष्ट होईल़

या उमेदवारांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष
अरविंद सावंत । शिवसेना : मिलिंद देवरा यांच्यावर मात करत अरविंद सावंत यांनी २०१४ साली धक्कादायक निकालाची नोंद केली होती. मोदी लाटेमुळे हा करिष्मा झाल्याची चर्चा त्या वेळी होती. या चर्चेला पूर्णविराम देत मतदारसंघावर आपली पकड सिद्ध करण्याचे आव्हान सावंत यांच्यासमोर होते. त्यात ते कितपत यशस्वी ठरले, पाच वर्षांपूर्वी मोदींसाठी गुजराती, मारवाडी मते शिवसेनेकडे आली होती. यंदाही तोच ट्रेंड कायम राहणार का, यावर बरेचसे गणित अवलंबून आहे.
मिलिंद देवरा । काँग्रेस : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याशी जवळीक असल्याचा आरोप काँग्रेससह सर्वच विरोधकांनी सातत्याने केला. दक्षिण मुंबईत मात्र अंबानींसह अन्य उद्योजकांनी काँग्रेसच्या देवरा यांना पाठिंबा जाहीर केल्याने मोठी चर्चा रंगली होती. शिवसेनेकडे गेलेला हा मतदारसंघ देवरा परत खेचून आणणार का, याचा आज फैसला होणार आहे. दक्षिण मुंबईतील देवरा कुटुंबाची सारी ताकद यानिमित्ताने पणास लागली आहे.

राहुल शेवाळे । शिवसेना : सलग चार वर्षे स्थायी समितीच्या माध्यमातून शेवाळे यांनी महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१४ साली प्रथमच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि यशस्वी झाले. आपल्या कामगिरीच्या जोरावर यंदाही यशस्वी होणार असा त्यांचा दावा आहे. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचा इथल्या निकालावर परिणाम होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
एकनाथ गायकवाड। काँग्रेस : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पराभवाचा धक्का देत २००४ साली गायकवाड सर्वप्रथम खासदार बनले. धारावीतील पकड मजबूत ठेवत २००९ सालीही ते यशस्वी झाले. मोदी लाटेमुळे गेलेली खासदारकी परत मिळविण्यासाठी गायकवाड यांनी कंबर कसली होती. विशेषत: पाचशे फुटांचे घर देण्याची घोषणा राहुल गांधी यांनी मुंबईतील सभेत केली होती. त्यामुळे धारावीकर पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळतील, असा त्यांचा दावा आहे.

पूनम महाजन । भाजप : दिवंगत प्रमोद महाजनांचा वारसा सांगणाºया पूनम महाजन २०१४ साली प्रथमच खासदार बनल्या. काँग्रेससाठी अनुकूल असलेल्या मतदारसंघात प्रिया दत्त यांच्यासारख्या दिग्गज प्रतिस्पर्ध्यावर मात करीत त्यांनी हे यश मिळविले होते. गेल्या वेळी नवमतदारांनी भाजपला साथ दिली होती. हा मतदार पूनम महाजन आपल्याकडे राखतात का, यावरच येथील गणित अवलंबून आहे. भाजयुमोच्या जबाबदारीचाही त्यांना फायदा मिळण्याची शक्यता आहे.
प्रिया दत्त। काँग्रेस : दिवंगत सुनील दत्त यांचा हा मतदारसंघ कायमच काँग्रेससाठी अनुकूल राहिला. प्रिया दत्त दोनवेळा येथून निवडून आल्या. मोदी लाटेत पराभवचा फटका बसला. पराभवानंतर पक्ष संघटनेकडील दुर्लक्ष, निष्क्रियता आणि अंतर्गत गटबाजीमुळे काही महिन्यांपूर्वी दत्त यांनी राजकीय निवृत्तीही जाहीर केली होती. या साºयाचा परिणाम प्रचारातही जाणवला. त्यामुळे दत्त यांची सारी भिस्त काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांवरच असणार आहे.

मनोज कोटक। भाजप : किरीट सोमय्या यांना डच्चू देत ऐनवेळी भाजपने कोटक यांना उमेदवारी दिली. पालिका राजकारणातील कोटक हे महत्त्वाचे प्रस्थ. ऐनवेळी उमेदवारी मिळाली असली तरी संघटनेच्या ताकदीवर ही जागा खेचता येईल, असा भाजप नेत्यांना विश्वास आहे. गुजराती, मारवाडी आणिं उत्तर भारतीय मते भाजपसोबतच राहतील, असा भाजपचा दावा आहे. तर, पालिकेतील प्रभावही कोटक यांची जमेची बाजू ठरली.
संजय दिना पाटील । राष्ट्रवादी : राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली मुंबईतील ही एकमेव जागा. गोवंडी, शिवाजीनगर पट्ट्यातील एकगठ्ठा मुस्लीम मते आणि मनसे फॅक्टरमुळे मराठी मतेही आपल्याकडे वळतील, असा कयास राष्ट्रवादीकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र, चार वर्षांची निष्क्रियता आणि काही महिन्यांपूर्वीपर्यंत पक्षांतराची चर्चा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मनसे फॅक्टर किती चालेल यावरच येथील राजकीय गणित अवलंबून आहे.

गजानन कीर्तिकर । शिवसेना : ज्येष्ठ शिवसैनिक अशी कीर्तिकरांची ओळख. स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून या भागात मोठे नेटवर्क. वयोमानामुळे यंदा पर्याय दिला जाईल, अशी चर्चा होती. मात्र त्यांनी आग्रहाने मतदारसंघ मागून घेतला. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली होती. चार वर्षे स्थानिक भाजप आमदारांशी संघर्ष केला. पण, युती झाल्याने ऐनवेळी त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली.
संजय निरुपम । काँग्रेस : शिवसैनिक म्हणून राजकीय जीवनात आलेले निरुपम आता थेट राहुल गांधी यांच्या निकटचे बनले आहेत. उत्तर मुंबईतून उत्तर पश्चिममध्ये येण्यासाठी निरुपम यांना मोठा संघर्ष करावा लागला. दिवंगत गुरुदास कामतांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याची भावना कामत गटात आजही आहे. शिवाय, मुंबईच्या अध्यक्षपदाचा कारभार हाकताना झालेला बेबनाव यामुळे शेवटपर्यंत निरुपम एकाकीच झुंजत असल्याचे चित्र मतदारसंघात होते.

गोपाळ शेट्टी । भाजप : तब्बल साडेचार लाख मतांनी विजयी होत शेट्टी यांनी विक्रम रचला होता. उत्तर मुंबईत नगरसेवक, आमदार आणि आता खासदार असा प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी म्हणून शेट्टी कार्यरत आहेत. मोठा जनसंपर्क आणि भाजपचे मजबूत संघटन ही उत्तर मुंबईत शेट्टी यांची जमेची बाजू राहिली आहे. उत्तर मुंबईतील उमेदवारीसाठी स्थानिक काँग्रेस नेते फारसे उत्सुक नव्हते, यातच इथल्या राजकारणाचा अंदाज येतो.
ऊर्मिला मातोंडकर। काँग्रेस : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने ऐनवेळी ऊर्मिला मातोंडकरला उमेदवारी देत इथल्या लढतीत रंगत आणली. बॉलीवूडमधला हा चेहरा राजकारणात कसा निभावणार अशी चर्चा असतानाच ऊर्मिलाची राजकीय, सामाजिक समज अनेकांना धक्का देणारी ठरली. ऊर्मिलाने आक्रमकपणे प्रचाराची धुरा सांभाळत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. प्रचारादरम्यान अनेकवेळा हा मतदारसंघ देशव्यापी चर्चेचा विषय ठरला होता.

Web Title: Mumbai's decision today; Kaul Ekaterifi's condition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.