मुंबईचा पुरातन वारसा आता पुस्तकरूपात; ‘अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव’चे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 09:21 IST2025-10-03T09:21:34+5:302025-10-03T09:21:55+5:30
मुंबईची ओळख सांगणाऱ्या कितीतरी वास्तू त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांसह आता आपल्याला एका पुस्तकात पाहता-वाचता येणार आहेत.

मुंबईचा पुरातन वारसा आता पुस्तकरूपात; ‘अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव’चे प्रकाशन
मुंबई : एशियाटिक ग्रंथालयाची भव्य वास्तू... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची देखणी इमारत... गेट वे ऑफ इंडियासमोर समुद्राच्या लाटांशी हितगुज करणारे ताज महाल हॉटेल...दुरूनच लक्ष वेधून घेणारा मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर... जोगेश्वरीतील गुंफा मुंबईची ओळख सांगणाऱ्या या आणि अशा कितीतरी वास्तू त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांसह आता आपल्याला एका पुस्तकात पाहता-वाचता येणार आहेत. मुंबई महापालिकेने ‘अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव’ या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून हा ठेवा संग्रहित केला आहे.
माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आज, बुधवारी या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ‘मुंबई महानगर काळाच्या प्रवाहात असंख्य संस्कृती, परंपरा आणि स्मृती आपल्या अंगाखांद्यावर घेऊन उभे आहे. मुंबईचे अभिजात सौंदर्य शतकानुशतकांच्या पुरातन वारशात आणि भव्य वास्तुंमध्ये दडलेले आहे. अशाच वैभवशाली वारशांना ‘अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव’ या कॉफी टेबल बुकमध्ये माहिती आणि चित्ररूपात गुंफले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पुस्तकात महापालिकेने मुंबईतील ऐतिहासिक वारसा वास्तूंवर नव्याने प्रकाश टाकला असून वैभवशाली पुरातन वारशाची ही समृद्धता उलगडली आहे’, असे गौरवोद्गार शेलार यांनी काढले.
याच कार्यक्रमात वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण आणि जतन करण्याच्या उद्देशाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाद्वारे २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभही शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.
काय आहे पुस्तकात?
पुस्तकात मुंबईतील लेणी, किल्ले तसेच गॉथिक, निओ-गॉथिक, आर्ट डेको, इंडो-सारसॅनिक, निओ-क्लासिकल आदी स्थापत्यशैलींतील वारसा वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा स्थळे, वसाहतकालीन आणि शासकीय वास्तू, वैद्यकीय वारसा स्थळे, शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा स्थळे, किल्ले व दुर्ग वारसा स्थळे, हरित वारसा स्थळे, स्मारके, कारंजे व चौक, धार्मिक वारसा स्थळे आदींबाबतची माहिती आणि छायाचित्रे पुस्तकात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला त्याच्या संस्कृतीसह आधुनिक कालखंडात नेण्याची रूपरेषा आखली आहे. या पार्श्वभूमीवर, हे कॉफी टेबल बुक मुंबईच्या संस्कृतीचा, वास्तूंचा वारसा पुढे नेणारे आहे. मुंबईतील वारशाचे ऐतिहासिक महत्त्व या पुस्तकातून लोकांपर्यंत पोहोचेल.
भूषण गगराणी, पालिका आयुक्त