लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धकाधकीच्या जीवनशैलीत तणावाशी झुंज देणाऱ्या मुंबईकरांसाठी एक चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. इंटरनेटवर नकारात्मक आशय पाहण्याची सवय मानसिक आरोग्य अधिक बिघडवू शकते, असे नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये एका प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात यावर महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली गेली आहेत.
डेटा मोठ्या प्रमाणावर विश्लेषणाद्वारे करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार, जे लोक सतत निराशाजनक, आक्रमक किंवा वादग्रस्त कंटेंट पाहतात, त्यांच्यात चिंता, नैराश्य आणि तणावाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले आढळते. मुंबईसारख्या शहरात लोकल प्रवास, कामाचा ताण आणि सतत मोबाईल वापर यामुळे या परिणामाची तीव्रता अधिक जाणवू शकते.
संशोधनात नमूद केल्याप्रमाणे, हा प्रश्न केवळ स्क्रीन टाइमचा नसून, वापरकर्ते कोणत्या प्रकारचा आशय पाहतात, यावर अधिक अवलंबून आहे. नकारात्मक कंटेंट सतत पाहिल्याने 'फीडबॅक लूप' तयार होतो, ज्यामुळे व्यक्ती अधिकच तणावग्रस्त बनते आणि त्या चक्रातून बाहेर पडणे कठीण होते. डिजिटल वातावरण केवळ वास्तवाचे प्रतिबिंब नसून, ते मानसिक स्थिती घडवण्यात सक्रिय भूमिका बजावते, असे संशोधकांचे मत आहे. मुंबईकरांसह सर्वांनीच डिजिटल वापराबाबत सजग राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
'अल्गोरिदम्स'बाबत प्रश्न
निष्कर्षांमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि त्यांच्या अल्गोरिदम्सच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. वादग्रस्त आणि भावनिक कंटेंटला अधिक प्राधान्य दिल्यामुळे वापरकर्त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, प्लॅटफॉर्म मॉडरेशन, अल्गोरिदममध्ये बदल आणि वापरकर्त्यांमध्ये जागरुकता वाढवणे आवश्यक आहे, 'डिजिटल हायजीन' पाळणे, नकारात्मक कंटेंटपासून दूर राहणे, सोशल मीडिया वापर मर्यादित ठेवणे यावरही भर दिला जात आहे. एकंदरीत, ऑनलाइन नकारात्मक आशय हा केवळ विद्यमान समस्यांचे प्रतिबिंब नसून, त्या अधिक गंभीर करण्यास कारणीभूत ठरतो.
हल्ली मोबाइलवर मित्रांच्या ग्रुपवरही राजकीय किंवा अन्य नकारात्मक कंटेंट अधिक येत असल्याने भांडणे, वाद वाढत आहे. जर एखाद्याला माहीत आहे की आपल्याला नैराश्य येते तर त्यांनी आवर्जून निगेटिव्ह कंटेंट बघणे टाळायला हवे. केवळ मोठ्या व्यक्तींवरच नाही तर लहान मुलांवरही निगेटिव्ह कंटेंटचा वाईट परिणाम होऊ शकतो. - डॉ. श्रीकांत चोरघडे, मानसोपचार तज्ज्ञ
Web Summary : Mumbai residents face increased anxiety and depression due to exposure to negative online content. A study reveals constant consumption of distressing material worsens mental health. Experts advise digital hygiene, limiting social media, and awareness to mitigate adverse effects, especially among youth.
Web Summary : मुंबई के निवासी ऑनलाइन नकारात्मक सामग्री के संपर्क में आने से बढ़ी हुई चिंता और अवसाद का सामना कर रहे हैं। एक अध्ययन से पता चलता है कि लगातार परेशान करने वाली सामग्री का सेवन मानसिक स्वास्थ्य को खराब करता है। विशेषज्ञ डिजिटल स्वच्छता, सोशल मीडिया को सीमित करने और प्रतिकूल प्रभावों को कम करने के लिए जागरूकता की सलाह देते हैं, खासकर युवाओं में।