मुंबई : मुंबईत मेट्रोचे नेटवर्क सक्रिय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईकर घर खरेदी करताना मेट्रो स्टेशनजवळ घर घेण्यास प्राधान्य देत असल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे दिसून आले आहे. लोकांची वाढती पसंती ही विकासकांच्या पथ्यावर पडत असून, मेट्रोनजीकच्या घरांच्या किमती गेल्या सहा महिन्यांत किमान २० टक्के वाढल्या आहेत.आजच्या घडीला मुंबईत मेट्रोचे जे काम सुरू आहे त्यापैकी ७० किलोमीटर मार्गावर मेट्रोची सेवा कार्यान्वित झाली आहे. येत्या काही महिन्यात १०० किलोमीटरपर्यंत त्यांची व्याप्ती वाढणार आहे. तर, आगामी तीन वर्षांत मेट्रोचे जाळे ३०० किमीपर्यंत विकसित होणार आहे. मेट्रोमुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होत असल्यामुळे आता मेट्रो स्टेशन जवळ घर हा ट्रेन्ड विकसित होत आहे.
वेळेची होते बचतमेट्रो आणि कोस्टल रोड या पायाभूत सुविधांमुळे पश्चिम उपनगरात अगदी बोरिवलीपासून मुंबईत येण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होत आहे. परिणामी, तिथे घर घेण्यास लोक प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे मेट्रो जवळ घर घेणाऱ्या लोकांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, जी नवी घरे अंधेरी व परिसरात आहेत तेथील प्रति चौरस फूट दर हे आता ६० हजार रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, त्या परिसरातील जुन्या इमारतींमधील दर २० टक्के कमी असल्याचेही सर्वेक्षणात दिसून आले आहे.