मुंबईकरांनो, आता कोणत्याही मेट्रो मार्गिकेने प्रवास करा, तिकीट एकाच ॲपमधून काढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:16 IST2025-09-25T10:13:37+5:302025-09-25T10:16:52+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी आणले ‘वन तिकीट’ ॲप, जून २०२५ मध्ये पहिल्यांदा हे ॲप मेट्रो ३ मार्गिकेवर सुरू झाले होते. आता मेट्रो १ मार्गिकेवरही हे ॲप लॉन्च केले आहे.

मुंबईकरांनो, आता कोणत्याही मेट्रो मार्गिकेने प्रवास करा, तिकीट एकाच ॲपमधून काढा
मुंबई : मुंबईतील वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांचे तिकीट बुक करणे आता सोपे झाले आहे. वर्सोवा ते घाटकोपर ‘मेट्रो १’ मार्गिकेचे संचलन करणाऱ्या ‘मुंबई मेट्रो वन’ने ‘वन तिकीट’ हे ॲप आणले असून, त्याद्वारे प्रवासी विविध मेट्रो मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी एकाच वेळी एकत्रित तिकीट बुकिंग करू शकणार आहेत. विविध मार्गांसाठी प्रवाशांना आता वेगवेगळी ॲप डाउनलोड करण्याची गरज पडणार नाही.
महामुंबईत जवळपास ४५० किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जाणार आहे. सध्या मुंबईत ७० किमीचे मेट्रो मार्ग सुरू आहेत. मात्र, या मार्गिकांचे संचलन एमएमएमओसीएल, एमएमओपीएल आणि एमएमआरसी या तीन वेगवेगळ्या संस्थांकडून केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना गोंधळ होऊ नये, यासाठी हे मेट्रो जाळे विस्तारत असताना महामुंबईत एकाच तिकीट प्रणालीची गरज निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर एमएमओपीएलने ओएनडीसी नेटवर्कवर ‘वन तिकीट’ ॲप उपलब्ध केले आहे. त्यातून प्रवाशांना एकाच व्यवहारात विविध मेट्रो मार्गिकांवरील प्रवासासाठी तिकीट खरेदी करणे शक्य होणार आहे. तसेच मेट्रोचा सलग प्रवासही विनाअडथळा करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ॲपचा असा करा वापर
मोबाइलवर ॲप डाउनलोड करून मोबाइल नंबरद्वारे साइन-अप करावे
ओटीपीद्वारे पडताळणी करावी
जवळचे स्टेशन आपोआप निवडले जाईल, गंतव्य स्टेशन निवडून पुढे जावे
एका व्यवहारात जास्तीत जास्त चार तिकिटे खरेदी करता येतील.
पेमेंट पूर्ण झाल्यानंतर ॲपमध्येच क्युआर तिकीट जनरेट होईल.
या ॲपचे फायदे
जवळचे स्टेशन आपोआप निवडले जाते, प्रत्येक मार्गिकेसाठी वेगवेगळे तिकीट घेण्याची गरज नाही.
प्रवासात विविध स्टेशनची माहिती मिळते, दैनंदिन तसेच प्रथमच प्रवास करणाऱ्यांसाठी फायदेशीर