Join us  

मुंबईकरांची सकाळ जोर ‘धार’; दादरमध्ये छत कोसळून २ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 12:18 PM

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम

मुंबई : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी पहाटेपासून मुंबईसह लगतच्या परिसरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली; आणि मुंबईकरांना धडकी भरली. सकाळपासून लागून राहिलेला पाऊस दुपारी मात्र ओसरला व मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, सकाळच्या ८ ते १० यावेळेत मुंबईचे रस्ते अक्षरश: पावसाच्या पाण्याने न्हाहून निघाले. धो धो कोसळणा-या पावसातच मुंबापुरी आस्ते कदम का होईना आपल्या ट्रॅकवर राहिली. दुपारी पाऊस कमी झाल्यानंतर मुंबईने पहिल्यासारखा आपला वेग पकडला. मात्र दाटून आलेले पावसाचे ढग कायम असल्याने मुंबईकरांवर मुसळधार पावसाची टांगती तलवार कायम होती.

मुंबईत २३.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, मुंबईत आतापर्यंत १०४.०७ टक्के  पावसाची नोंद झाली आहे. पाऊस कोसळत असतानाच पडझडीच्या घटनाही घडत होत्या. शहरात एक ठिकाणी छताचा भाग कोसळला. पश्चिम उपनगरात एक ठिकाणी झाड कोसळले. मुंबईत ६ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या.  दादर पश्चिम येथील शिल्प सदन या ठिकाणी तळमजला अधिक तीन मजली बांधकाम असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळला. यात दोघांना किरकोळ मार लागला. सचिन जैसवाल आणि हिमांशु जैसवाल अशी त्यांची नावे आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्याववर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.

पश्चिम किना-यावर कोकण आणि घाट परिसरात पाऊस घेऊन आलेल्या ढगांनी गर्दी केली होती. येथील लगतच्या परिसरात पाऊस ब-यापैकी सक्रीय होता. कोकणसह लगतच्या परिसराला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला. त्यानुसार, मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात पावसाने मुसळधार हजेरी लावली. विशेषत: मुंबई आणि ठाणे परिसराला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असतानाच पावसाने आपला मारा वेगाने कायम ठेवला होता. हवामान खात्याकडील नोंदीनुसार, मंगळवारी सकाळी मुंबई आणि ठाणे परिसरात तुरळक  ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. विशेषत: सकाळी ८ ते ९ या वेळेत मुंबईत बहुतांश ठिकाणी मुसळधार हजेरी लावली. कोकणचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्हयात २०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असतानाच पावसाचा मारा दिवसभर कायम होता. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमानसून स्पेशलपाऊसमुंबईहवामान