मुंबईकर विद्यार्थ्यांची पहिली पसंती फाइन आर्ट्सला; दुसरे प्राधान्य वाणिज्यला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 05:32 IST2019-03-16T05:32:14+5:302019-03-16T05:32:32+5:30
मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडून अहवाल शाळांकडे सुपुर्द

मुंबईकर विद्यार्थ्यांची पहिली पसंती फाइन आर्ट्सला; दुसरे प्राधान्य वाणिज्यला
मुंबई : कलचाचणीच्या जाहीर झालेल्या निकालानुसार मुंबईकर विद्यार्थ्यांनी पहिली पसंती ललित कला शाखेला (फाइन आटर््स) दिली आहे. २२.२९ टक्के विद्यार्थ्यांचा कल या शाखेकडे आहे, तर १८.१४ टक्क्यांसह त्यांनी दुसरी पसंती वाणिज्य शाखेला दिली आहे.
कलचाचणीचा अहवाल शनिवार, १६ मार्च, २०१९ रोजी सकाळी ११ वाजता महाकरिअर मित्रा डॉट इन या वेबसाइटवर उपलब्ध होईल. मुंबईतील ३ लाख ५१ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी कल-अभिक्षमता चाचणी दिली होती. मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडून हे अहवाल शाळांना सुपुर्द केल्याची माहिती विभागीय सचिव शरद खंडागळे यांनी दिली. २२ मार्चपर्यंत शाळा आणि शाळा प्रशासनाने हे अहवाल विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्यांच्या हाती सुपुर्द करायचे आहेत. या सूचना या आधीच त्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकर विद्यार्थ्यांनी पहिले प्राधान्य दिलेल्या क्षेत्रामध्ये दुसरा क्रमांक वाणिज्य शाखेचा लागला असून, त्यासाठी १८.१४ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे. १७.८३ % मुंबईकर विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेला पहिले प्राधान्य दिले असून, कृषीला पहिली पसंती देणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी १२.२३% आहे. मुंबईकर विद्यार्थ्यांच्या दुसरे प्राधान्य असलेल्या यादीत ललित कलेला दुसरे स्थान, तर गणवेशधारी सेवेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. यासाठी विद्यार्थ्यांची टक्केवारी अनुक्रमे १५.३३% आणि १४.१२% इतकी आहे. हा अहवाल त्यांना पुढील शाखा निवडीसाठी उपयुक्त ठरेल.
पोर्टलवर हजारो अभ्यासक्रमांची माहिती
विद्यार्थी त्यांच्या एसएससी बोर्ड क्रमांकाच्या आधारे त्यांचा कलचाचणी अहवाल महाकरिअर मित्रा या पोर्टलवरून आॅनलाइन प्राप्त करू शकतात. त्याचबरोबर, त्यांचा कल असलेल्या क्षेत्राविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ त्यांना पाहता येऊ शकणार आहे, तसेच प्रत्येक क्षेत्रनिहाय माहितीपर व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या कलक्षेत्रानुसार त्यांच्या जिल्ह्यातील उपलब्ध अभ्यासक्रमांचा शोध विद्यार्थ्यांना या पोर्टलद्वारे घेता येणार आहे. या ठिकाणी ८० हजारांहून अधिक शासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.