मुंबईकरांना कडक उन्हाचे चटके; पारा ४० अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:20 IST2025-04-09T12:20:35+5:302025-04-09T12:20:52+5:30
पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी, मरोळ या पट्ट्यातदेखील दुपारी उन्हाचा तडाखा बसत होता.

मुंबईकरांना कडक उन्हाचे चटके; पारा ४० अंशांवर
लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात आलेली उष्णतेची लाट मंगळवारीदेखील कायम होती. त्यामुळे येथील काही परिसरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४० अंश एवढा नोंदविण्यात आला आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश नोंदविण्यात आले असले तरी उष्ण आणि दमट हवामानाने मुंबईकरांना दिवसभर बेजार केले होते.
दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या तुलनेत पूर्व उपनगरातील कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, पवई, कांजूरमार्ग आणि साकीनाका या पट्ट्यामध्ये सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा कायम होता. पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी, मरोळ या पट्ट्यातदेखील दुपारी उन्हाचा तडाखा बसत होता.
वांद्रे कुर्ला संकुलात दिवसभर होणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे हवामान गरम होते. बुधवारीदेखील मुंबई महानगर प्रदेशात कमाल तापमानाचा पारा चढा राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानंतर मात्र कमाल तापमान खाली येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता
कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.