मुंबईकरांनो सावधान! पावसाळ्यातील 'हे' १८ दिवस धोक्याचे, पालिकेकडून तारखा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:06 IST2025-04-11T16:04:49+5:302025-04-11T16:06:29+5:30
यावर्षी पावसाळ्यात १८ दिवस समुद्राला मोठे उधाण येणार आहे, असा इशारा मुंबई महापालिकेच्या अपत्कालीन विभागाने दिला आहे.

मुंबईकरांनो सावधान! पावसाळ्यातील 'हे' १८ दिवस धोक्याचे, पालिकेकडून तारखा जाहीर
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी पावसळ्यात १८ दिवस समुद्राला उधाण येणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान समुद्रात साडेचार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळतील. त्यामुळे पावसळ्यात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणाऱ्या लोकांना मुंबई महानगरपालिकेने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पालिका प्रशासनाने यावर्षी पावसळ्यात कुठल्या दिवशी समुद्रकिनारी जाणे धोकादायक असेल, त्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.
पावसाळ्याला सुरुवात झाली की, मुंबईकरांची समुद्रकिनारी गर्दी पाहायला मिळते. हे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेकडून पावसळ्याआधीच उधाणाचे दिवसांची यादी जाहीर केली जाते. उधाणीच्या काळात समुद्रात उंच लाटा उसळतात. संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला जातो.
पावसाळ्यातील 'हे' १८ दिवस धोक्याचे
यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात एकूण १८ दिवस उधाणाचे असतील. जून महिन्यातील २४, २५, २६, २७, आणि २८ तारखेला असे एकूण पाच दिवस समुद्राला उधाण येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या ५ दिवसांत सकाळी ११.०० वाजल्यापासून दुपारी २.३० वाजेपर्यंत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यानंतर जुलै महिन्यात २४, २५, २६ आणि २७ तारखेला समुद्राला उधाण येईल. पुढे ऑगस्ट महिन्यात १०, ११, १२, १३ आणि २४ तारखेला समुद्राला उधाण येईल. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ८, ९, १०, ११ तारखेला समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे.
महापालिका अलर्ट
ज्या दिवशी समुद्राला उधाण येणार आहे, तेव्हा नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यापासून मज्जाव करण्यात येणार आहे. मुंबईमहानगरपालिकेने जाहीर केलेल्या तारखांनुसार, मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त समुद्र किनारी समुद्र किनारी ठेवण्यात येणार आहे.