मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 06:24 IST2025-10-10T06:24:45+5:302025-10-10T06:24:52+5:30
आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो-३ ची आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अखेरच्या टप्पातील वाहतूक गुरुवारी सकाळी सुरू झाली. त्याबरोबर पहिल्याच दिवशी प्रवाशांनी या मेट्रोने प्रवास करून कार्यालय गाठण्याला पसंती दिली.

मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कफ परेड, नरिमन पॉईंट, विधान भवन भागांतील कार्यालयात जाणे लाखो प्रवाशांसाठी गुरुवारपासून अधिक सुकर झाले. सीएसएमटी आणि चर्चगेट भागांतून जाणाऱ्या प्रवाशांना मेट्रो-३ ने या भागांतील कार्यालयात दहा ते पंधरा मिनिटांत पोहोचणे शक्य झाले आहे. त्यातून प्रवासाच्या वेळेत अर्ध्या तासाहून अधिक वेळेची बचत झाली आहे.
आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो-३ ची आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अखेरच्या टप्पातील वाहतूक गुरुवारी सकाळी सुरू झाली. त्याबरोबर पहिल्याच दिवशी प्रवाशांनी या मेट्रोने प्रवास करून कार्यालय गाठण्याला पसंती दिली.
विधानभवनजवळ कार्यालय असलेल्या सुदेश केळकर याने कार्यालय गाठण्यासाठी सीएसएमटी स्थानकातून मेट्रोने प्रवास केला. पंधरा मिनिटांत कार्यालयात आता पोहोचू शकणार असल्याचा आनंद त्याने व्यक्त केला. यापूर्वी विधानभवन येथून सीएसएमटीला येण्यासाठी बसची अर्धा तास प्रतीक्षा करावी लागत होती. बससाठीही रांगेत उभे राहावे लागत होते. वाहतूक कोंडी झाली असल्यास सीएसएमटीला पोहोचण्यासाठी अर्धा ते एक तास जात होता. आता मेट्रोने २० रुपयांत कार्यालय गाठू शकतो, असे त्याने सांगितले. तर कफ परेडला दुकान असलेल्या नारायण मूर्ती यांना सीएसएमटीवरून दुकानात जाण्यासाठी गर्दीच्या वेळी पाऊण ते एक तास लागत असे.
आरे ते आचार्य अत्रे चौक या भुयारी मेट्रोच्या मार्गावर मागील काही काळापासून सुमारे ७० हजार प्रवासी दरदिवशी प्रवास करत होते. आरे ते कफ परेड हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर रात्री ९ वाजेपर्यंत १,४६,०८७ प्रवाशांनी या मेट्रोतून प्रवास केला होता. रात्री १०:३० वाजेपर्यंत मेट्रोची सेवा सुरू राहणार असून, त्यातून प्रवासी संख्येत आणखी वाढ होणार आहे.
विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
आरे ते कफ परेड मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा मार्ग प्रवासी सेवेत दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी गुरुवारी अलोट गर्दीचा प्रकार घडला. त्यातून विधानभवन मेट्रो स्थानकाचे एक प्रवेशद्वार काही वेळासाठी बंद करण्याची वेळ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर (एमएमआरसी)आली.
नरिमन पॉइंट भागात मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत. त्यामधील कर्मचारी सायंकाळी सीएसएमटी अथवा चर्चगेट स्थानकात येतात. तिथून पुढे ते रेल्वेने प्रवास करतात. मेट्रोने आता विधानभवन येथून सीएसएमटीला १० मिनिटांत पोहोचणे शक्य असल्याने अनेकांनी मेट्रोचा पर्याय निवडला. मात्र, कार्यालयातून सुटलेले कर्मचारी मोठ्या संख्येने स्थानकात दाखल झाल्याने एकच गर्दी झाली. त्यातच पहिल्या दिवशी अनेक स्थानकांवर तिकीट खिडक्यांवरील सर्व काउंटर सुरू नव्हते. त्यातून रांगा लागत असल्याचे चित्र होते.
एमएमआरसीकडे विचारणा केली असता सायंकाळी गर्दीच्या वेळेत विधानभवन स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीचे सुरळीत व्यवस्थापन आणि सुरक्षितता राखण्यासाठी स्थानकावरील सात प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार सुमारे १० मिनिटांसाठी तात्पुरते बंद केले होते. कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणली, अशी माहिती एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.