लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवडी आणि काळाचौकी परिसरात अघोषित पाणीकपात सुरू असल्याचा आरोप येथील रहिवासी करीत आहेत. नियमित वेळेपेक्षा १० ते ३० मिनिटे कमी पाणीपुरवठा होत असल्याची त्यांची तक्रार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी म्हणजे ४७ टक्क्यांवर आला आहे. जसजसा उन्हाळा तीव्र होईल बाष्पीभवनाचे प्रमाण वाढून पाणीसाठ्यात आणखी घट होईल. त्यामुळे पालिकेने आतापासूनच पाणीकपातीचा पवित्रा घेतल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सध्या तापमान ३७ अंशांवर आहे. त्यामुळे साहजिकच जलाशयांतील बाष्पीभवनाचा वेग वाढून पाणीसाठ्यात घट संभवते. सात जलाशयांतील पाणीसाठा तीन ते चार महिने पुरवावा लागणार आहे. दरम्यान, मुंबईच्या काही भागांत आतापासून पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत.
शिवडी पूर्व आणि पश्चिम विभागांतील नियमित वेळेपेक्षा अंदाजे १० ते ३० मिनिटे कमी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप उद्धवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला.
ऑक्टोबरमध्ये हंडा मोर्चा
गेल्या काही महिन्यांपासून शिवडी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. ऑक्टोबरमध्येही आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात आला होता. तरीही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.
पाणी किती वेळ येते?
रेतीबंदर परिसरात संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र तो ८:४५ लाच बंद होतो; तर शिवडी गाडी अड्डा येथील पाणीपुरवठ्याची वेळ संध्याकाळी ७ ते ९ अशी आहे.
मात्र या भागात ७:१० नंतर पाणी येते आणि ८:४५ वाजताच जाते. इंदिरानगर, हाजी बंदर रोड, फोर्सबेरी रोड येथील पाणीपुरवठ्याची वेळ ६:४५ ते ८:४५ अशी आहे.
प्रत्यक्षात अर्धा तास पाणीपुरवठा कमी होतो, अशी रहिवाशांची तक्रार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी नगरसेवक पडवळ यांनी पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.