बंद पुलांमुळे मुंबईकर हैराण : सोयीची उड्डाणपूल ठरत आहेत डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 04:27 AM2019-11-25T04:27:09+5:302019-11-25T04:27:47+5:30

वाहतूककोंडीत अडकलेल्या मुंबईत पुलांमुळे नागरिकांचा प्रवास सुसाट आणि सुरक्षित झाला. अंधेरी येथील गोखले पूल आणि सीएसटीचा हिमालय पादचारी पूल दुर्घटना आणि नुकताच दादरच्या टिळक पुलाचा भाग कोसळल्याने मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे.

Mumbaikar annoyed with closed bridges: Convenient flight bridges are a headache | बंद पुलांमुळे मुंबईकर हैराण : सोयीची उड्डाणपूल ठरत आहेत डोकेदुखी

बंद पुलांमुळे मुंबईकर हैराण : सोयीची उड्डाणपूल ठरत आहेत डोकेदुखी

Next

- शेफाली परब-पंडित 

मुंबई : वाहतूककोंडीत अडकलेल्या मुंबईत पुलांमुळे नागरिकांचा प्रवास सुसाट आणि सुरक्षित झाला. अंधेरी येथील गोखले पूल आणि सीएसटीचा हिमालय पादचारी पूल दुर्घटना आणि नुकताच दादरच्या टिळक पुलाचा भाग कोसळल्याने मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे. खबरदारी म्हणून पालिकेने काही पूल बंद केले. पण यामुळे त्या-त्या परिसरात वाहतुकीचा ताण वाढला असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या त्रासात भर पडली आहे. रोजच्या प्रवासात वेळ, वाहन आणि पैसा वाया जात असल्याने मुंबईकर मेटाकुटीस आले आहेत. यापैकी काही पुलांच्या पुनर्बांधणीचे कागदी घोडे तेवढे नाचविण्यात येत असल्याने चाकरमान्यांचे हाल आणखी काही काळ कायम राहण्याची चिन्हे आहेत.

बंद पुलांची दुरुस्ती केव्हा?
चार वर्षांपूर्वी हँकॉक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यापाठोपाठ कर्नाक बंदर पूलही धोकादायक असल्याने अवजड वाहनांसाठी बंद केला. या पुलांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. गेल्या वर्षी लोअर परळचा डिलाईल रोड पूल आणि काही महिन्यांपूर्वी घाटकोपरचा पूल बंद करण्यात आला. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यात गेल्या वर्षभरात २९ अतिधोकादायक पुलांपैकी काही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने अडचणीत भर पडली आहे. शहरातील अशा दोनशे पुलांची छोटी-मोठी दुरुस्ती होणार आहे.

दक्षिण मध्य मुंबईत वाहतूककोंडी
१९२१ मध्ये ब्रिटिशकाळात बांधलेला लोअर परळचा डिलाईल रोड पूल २४ जुलै २०१८ रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा पूल लोअर परळ, वरळी आणि प्रभादेवी, करी रोड, लालबाग आणि भायखळ्याकडे जाणाºया मार्गांमधील दुवा असल्याने येथे मोट्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. लोअर परळ भागात बहुसंख्य कॉर्पोरेट कार्यालये आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेचा संगम असलेला हा पूल येथे न्लाखो प्रवाशांसाठी सोयीचा होता. ाूल बंद केल्यामुळे लोअर परळ, करी रोड, वरळी तसेच पूर्व-पश्चिम प्रवास करणाऱ्यांची येथे गैरसोय होत आहे.

पुलांच्या आॅडिटचा वाद
शहर भागातील ब्रिटिशकालीन पुलांची वयोमर्यादा संपली आहे. त्यामुळे धोकादायक बनलेल्या या पुलांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये पुलांचे आॅडिट झाले. जुलै २०१८ मध्ये अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली. मात्र आॅडिटमध्ये फिट ठरलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय हा पादचारी पूल कोसळून सात लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने आॅडिट अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर नव्याने २९६ पुलांचे आॅडिट केले.

नवीन पुलासाठी तीन वर्षे प्रतीक्षा
लोअर परळ किंवा करी रोड स्थानकापर्यंतचे दहा मिनिटांचे अंतर पार करण्यास पादचाºयांना अर्धा तास तर वाहनचालकांना तास-दीड तास लागत आहे. दहा महिन्यांत या पुलाचे काम होणार होते. मात्र रेल्वे आणि महापालिकेच्या वादात या पुलाचे काम बराच काळ रखडले.
या पुलावर जाण्यासाठी तीन प्रवेश मार्ग आहेत. यापैकी एक करी रोड, दुसरा वरळी आणि तिसरा उत्तर दिशेने आहे. रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत रेल्वे प्रशासनाच्या विनंतीनुसार महापालिका करी रोडपर्यंतच्या मार्गावरील काम सुरू करणार नाही. या पुलावरील तीन प्रवेश मार्गांच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू आहे.
यासाठी ९४ कोटी रुपये खर्च आणि २४ महिन्यांचा कंत्राट कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पावसाळ्याचे चार महिने वगळण्यात येत असल्याने २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पूल विभागातील सूत्राने सांगितले.

हँकॉक पुलाला मुहूर्तच नाही
माझगाव आणि सँडहर्स्ट रोड येथील १३७ वर्षांचा सर्वात जुना हँकॉक पूल धोकादायक असल्याने जानेवारी २०१६ मध्ये पाडण्यात आला. मात्र चार वर्षांनंतरही हा पूल कधी बांधून पूर्ण होणार, याबाबत पालिकेकडे उत्तर नाही. आधी काळ्या यादीतील ठेकेदाराला पुलाचे काम दिल्याचा वाद, मग झोपड्यांचा अडथळा आणि आता मध्य रेल्वे आणि पालिकेच्या वादात पुलाचे काम रखडले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ओव्हर वायर व अन्य नुकसानाची भरपाई स्वरूपात ३९ कोटी रूपये पालिकेकडे मागितल्याचे सूत्रांकडून समजते. मार्च महिन्यात पालिकेने येथील झोपड्यांचा अडथळा दूर केला. मात्र जागा ताब्यात घेण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला गती मिळालेली नाही.

घाटकोपर पूलही रामभरोसे
घाटकोपर, लक्ष्मी बाग नाला हा धोकादायक पूल जून २०१९ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र यामुळे स्थानिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने छोट्या दुरुस्तीनंतर अवजड वाहनांना बंदी करून हा पूल खुला करण्यात आला. पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा हा पूल आहे. कार, रिक्षा आणि दुचाकीच या पुलावरून आता जातात. ३० मीटर रुंद आणि २५ मीटर लांब असलेला हा पूल पुनर्बांधणीद्वारे एकूण ४५ मीटर रुंद करण्यात येणार आहे. हा पूल बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.
कर्नाक बंदर पूलही रखडला
दक्षिण मुंबईत हँकॉक आणि कर्नाक बंदर हे दोन मोठे पूल आहेत. १५१ वर्षे जुना कर्नाक पूलही धोकादायक स्थितीत आहे. मात्र हँकॉक पूल बांधून होत नाही तोपर्यंत मशीद बंदर येथील कर्नाक पुलाचे काम पालिकेला सुरू करता येणार नाही. अवजड वाहनांना या पुलावरून पूर्णपणे बंदी आहे. मात्र त्यामुळे क्रॉफर्ड मार्केट, मनिष मार्केटमधून घाऊक माल उचलून उपनगराकडे जाणाºया मोठ्या ट्रकना तीन मिनिटांऐवजी २५ मिनिटांचा प्रवास करावा लागत आहे. वर्दळीच्या वेळेत या पुलावर वाहतूककोंडी होते. अवजड वाहने सीएसएमटीच्या दिशेने सरकत असल्याने छोट्या वाहनचालकांची वाडीबंदर ते कर्नाक बंदर परिसरात कोंडी होते.
या पुलांची दुरुस्ती केव्हा?
महालक्ष्मी रेल्वे उड्डाणपूल, करी रोड स्थानक उड्डाणपूल, शीव स्थानक रेल्वे उड्डाणपूल, धारावी रेल्वे उड्डाणपूल, दादरचा टिळक उड्डाणपूल, दादर फूल मार्केटजवळील पादचारी पूल, माहीम फाटक पादचारी पूल, दादर-धारावी नाल्यावरील पादचारी पूल, ग्रँट रोड रेल्वे स्थानकावरील पूल, आॅपेरा हाउस पूल, फ्रेंच पूल, हाजीअली भुयारी मार्ग, फॉकलंड रोड पूल,
प्रिन्सेस स्ट्रीट पूल, चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग, ग्लोरिया चर्च उड्डाणपूल, वाय ब्रिज उड्डाणपूल, ईस्टर्न फ्री-वेला जोडणारा पूल, एसव्हीपी रेल्वे पूल, वाय.एम. उड्डाणपूल, पी. डिमेलो पादचारी पूल, डॉकयार्ड रोड पादचारी पूल, चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग, प्रभादेवी स्थानक पूल, नाना
फडणवीस पूल, वडाळा, लोअर परळ पूल

लोअर परळ पुलाचे काम रात्रीस चाले

मुंबई : लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन डिलाइल पुलाचे काम रात्रीच्या वेळी सुरू आहे. हे काम खूप धिम्या गतीने सुरू असल्याने पुलाच्या कामाला आणखी एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळाच्या वरील पुलाच्या भागाचे पाडकाम करण्यात आले. बाकी इतर भागाचे पाडकाम अजून बाकी आहे. त्यामुळे पुलाच्या पाडकामानंतर नवीन पूल कधी उभारणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
लोअर परळ येथे रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेसाठीचे काम केले जात आहे. सहाव्या मार्गिकेसाठी एका क्रेनद्वारे पायाभूत कामे केली जात असल्याचे दिसून आले. तर लोअर परळ पश्चिमेकडे दोन ट्रकच्या साहाय्याने नवीन पुलाचे काम सुरू आहे. ही सर्व कामे रात्रीच्या वेळी करण्यात येत आहेत.
मागील १६ महिन्यांपासून रेल्वे रूळ मार्गावरील डिलाइल पुलाचे पाडकाम केले. मात्र इतर भाग जैसे थे आहे. त्यामुळे आणखी एक वर्ष रेल्वे रुळावरील कामासाठी लागण्याची शक्यता येथील कामगाराने व्यक्त केली.
डिलाइल पुलाच्या कामामुळे सर्वाधिक फटका टॅक्सी चालकांना बसला आहे. करी रोड आणि लोअर परळ स्थानकावरून प्रवास करणारे प्रवासी आधीच्या मानाने कमी झाले आहेत. प्रत्येक टॅक्सीचालकाचा व्यवसाय व्हावा यासाठी दिवसपाळी-रात्रपाळी अशा वेळा ठरवून टॅक्सी चालविण्यात येत आहेत, अशी माहिती एका टॅक्सी चालकाने दिली.
पुलाच्या कामामुळे येथे गर्दी होते. एकाच ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात जमल्यावर भाजी विकणे कठीण होते. परिणामी याचा उत्पन्नावर परिणाम होतो, अशी प्रतिक्रिया येथील भाजी विक्रेत्यांनी दिली.


कमकुवत कर्नाक पुलावर वाहतूककोंडी

कुलदीप घायवट
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मशीद रेल्वे स्थानकाजवळील कमकुवत कर्नाक पुलावरील वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. कर्नाक पुलावर सध्या जड वाहनांना जाण्यासाठी मज्जाव असला तरी इतर वाहनांमुळे येथे वाहतूककोंडी होत असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली.
ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाचे पाडकाम करण्यासाठी पालिकेने मध्य रेल्वेशी मागील वर्षी पत्रव्यवहार केला आहे. मात्र या पुलाचे पाडकाम अजून झाले नाही. कर्नाक पुलाशिवाय पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने पूल न पाडण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
१५१ वर्षे जुना कर्नाक पूल कमकुवत अवस्थेत आहे. त्यामुळे या पुलाचे पाडकाम करण्यासाठी पालिकेने मध्य रेल्वेशी पत्रव्यवहार केला होता. मात्र स्थानिकांनी पर्यायी मार्ग तयार होत नाही, तोपर्यंत पुलाचे तोडकाम केले जाऊ नये, अशी मागणी केली. कारण कर्नाक पूल तोडल्यास पी. डिमेलो मार्ग आणि डॉ. डी.एन. रोडमधील वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग बंद होईल.

कर्नाक पुलावर सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या काळात वाहतूककोंडी होते. या मार्गावरून जड वाहनांना जाण्यास मज्जाव केला असला तरी, चारचाकी, दुचाकी यांची संख्या प्रचंड असते. कर्नाक पुलावरील वाहतूककोंडीमुळे मांडवी, पूर्व द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी साधारण एक तासाचा अवधी लागतो.
- सचिन मरडेकर, टॅक्सीचालक

कर्नाक पुलाला सोयीस्कर पर्यायी मार्ग नाही. हा पूल तोडल्यास या भागातील हजारो रहिवाशांना, वाहनचालकांना बराच वळसा घालून ये-जा करावी लागेल. यासाठी नागरिकांना आपला एक ते दोन तास जादा वाया घालवावा लागेल.
- रहेमान सय्यद, रहिवासी

कर्नाक पूल कमकुवत झाला आहे.
रेल्वे मार्गावरील कर्नाक पुलाचा वरचा-खालचा भाग गंजलेला आहे.
सुरक्षा भिंत मोडकळीस आली आहे.
जास्त उंंचीची आणि जड वाहने येथून जाऊ नयेत, यासाठी येथे बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
पी. डिमेलो मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, मांडवी, डॉ. डी.एन. मार्ग, क्रॉफर्ड मार्केट यांना जोडण्यासाठी कर्नाक पूल सोयीस्कर आहे.

घाटकोपर येथील बंद पूल सुरू होऊनही समस्या जैसे थे

ओंकार गावंड
मुंबई : अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील घाटकोपर पूर्व बस डेपोजवळ असणारा पूल जून महिन्यात बंद करण्यात आला होता. यामुळे घाटकोपर पूर्व-पश्चिम परिसरांमध्ये ये-जा करताना वाहनचालकांना वळसा घालून जावे लागत होते. परिणामी, वाहतूककोंडीत भर पडून मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत होता. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, महानगरपालिकेने आॅगस्ट महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात या नाल्यावर लोखंडी पूल बांधला. हा पूल बांधल्याने या मार्गावरून वाहतूक सुरू झाली खरी, परंतु समस्या जैसे थे आहेत.
पालिकेने या मार्गावर पूल बांधला, परंतु त्यावर दुचाकी, रिक्षा व कार यांनाच प्रवेश ठेवला आहे. अवजड वाहने जसे की, बस व ट्रक यांना या पुलावरून प्रवेश नाकरण्यात आला आहे. यामुळे लिंक रोड वरून ये-जा करणाऱ्या बस व ट्रक यांना घाटकोपर पूर्व-पश्चिम ये-जा करताना पंतनगर, नायडू कॉलनी, गारोडियानगर, अमरमहल, गांधीनगर इतर भागांमधून वळसा घालून यावे लागत आहे. ही मोठी वाहने परिसरातील अरुंद रस्त्यांवरून पर्यायी मार्ग निवडत असल्याने, मुख्य मार्गासोबत परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूककोंडी होत आहे. या मार्गांवर वाहतुकीचा झालेला खोळंबा सोडविताना वाहतूक पोलिसांनाही कसरत करावी लागते.
तात्पुरत्या स्वरूपात बांधला गेलेला हा पूल येत्या महिन्याभरात पक्का पूल बांधण्यासाठी पुन्हा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे करण्याचा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर उभा आहे. जून महिन्यात हा पूल बंद करण्यात आल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली होती. पूर्व उपनगरामधून पश्चिम उपनगरामध्ये जाताना वाहनचालकांकडून याच मार्गाचा वापर केला जातो. एलबीएस मार्गावर सुरू असलेले मेट्रो काम, पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम यांमुळे या मार्गांवर वाहतूककोंडी होत आहे. अंधेरी-घाटकोपर लिंक रोड घाटकोपर येथे बंद झाल्यास वाहनचालकांच्या त्रासात भर पडणार आहे.

वाहतूककोंडीमुळे वाहन चालविण्याची इच्छा उडाली आहे. याचा परिणाम आमच्या रोजच्या धंद्यावर होत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून ट्रक व बसची वाहतूक वाढली असल्याने छोट्या गाड्यांचा खोळंबा होत आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
- महादेव रेळे, रिक्षाचालक.

अंधेरी-घाटकोपर लिंक रोड अचानक बंद केल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय झाली होती, परंतु काही कालावधीसाठी हा पूल सुरू केल्याने वाहतूककोंडी कमी झाली आहे. अवजड वाहने अंतर्गत रस्त्यांवरून जात असल्याने तेथे वाहतूककोंडी वाढली आहे. गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजाने ध्वनिप्रदूषण होत आहे. वाहतूक कोंडीच्या वेळी वाहनचालकांनी लेनची शिस्त पाळणे गरजेचे आहे.
- चिराग सोलंकी, स्थानिक रहिवासी.
 

Web Title: Mumbaikar annoyed with closed bridges: Convenient flight bridges are a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई