Join us  

छायाचित्रकाराला डंपरखाली चिरडणाऱ्याला अखेर अटक !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 1:52 PM

छायाचित्रकाराला डंपरखाली चिरडून फरार झालेल्या डंपर चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई - छायाचित्रकाराला डंपरखाली चिरडून फरार झालेल्या डंपर चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कोणताही 'धागादोरा' तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला नसतानाही अत्यंत शिताफीने तपास करत सोमवारी रिंटू उपेंद्र दास (३८) या चालकाच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश मिळाले आहे. रिंटू दास हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे.

जेव्हीएलआर मार्गावर १५ सप्टेंबरला बौद्ध विहार परिसरात झालेल्या अपघातात ओमकार पाटील (२२) नावाच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला, तर त्याचा  मित्र निखिल चव्हाण (२८) हा गंभीर जखमी झाला. हे दोघे वरळी कोळीवाडा परीसरात राहणारे असून व्यवसायाने छायाचित्रकार होते. पाटील आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असून तो पवईच्या दिशेने निखिलसोबत बाईकवरुन निघाला होता. त्याचवेळी घडलेल्या अपघातात डंपरच्या मागील चाकाखाली पाटीलचे डोके आले. तर चव्हाणदेखील दूरवर फेकला गेला. स्थानिकांनी आरडाओरड केलेली पाहून डंपरचालक घटनास्थळाहून फरार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या अपघाताचा एकही प्रत्यक्षदर्शी पोलिसांना सापडला नाही. त्याचमुळे आरोपीला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. ती पुसटशी 'नंबरप्लेट' आणि भिंगएमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजीत महिडा हे पोलीस निरीक्षक केदारी पवार आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने याप्रकरणाचा तपास करत होते. बरीच शोधाशोध केल्यानंतर जेव्हीएलआर परिसरात असलेल्या ओम वेदांत पेट्रोलपंपच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना पुसटशी कैद झाल्याचे त्यांना आढळले. तास-न्- तास हे फुटेज  खंगाळल्यानंतर महिडा यांना एक आईस्क्रीम कंपनीची गाडी पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या डंपरजवळ दिसली. आईस्क्रीम कंपनीच्या चालकाचा शोध त्यांनी घेत त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने अपघात पाहिल्याचे सांगितले. मात्र त्याला डंपरबाबत काहीच सांगता येत नव्हते. त्यामुळे पुन्हा सीसीटीव्ही फुटेज हे चक्क भिंगाच्या मदतीने त्यांनी तपासले. तेव्हा त्यांना डंपरची 'पुसटशी' नंबरलप्लेट दिसली. त्या नंबरची माहीती आरटीओ कार्यालयातून त्यांनी मिळवली आणि दासला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

टॅग्स :गुन्हेगारीअपघात