Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 20:56 IST2025-05-09T20:54:56+5:302025-05-09T20:56:39+5:30
Mumbai Wockhardt Hospital Sleep Survey: झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला केवळ एक पर्याय न मानता आरोग्याचा मूलभूत आधारस्तंभ मानण्याची वेळ आली आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत राहणारे बहुतेक काम करणारे नागरिक झोपेपासून वंचित आहेत. मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटलने नुकत्याच केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात ३० ते ५५ वयोगटातील कार्यरत मुंबईकरांनी भाग घेतला. या लोकांनी झोप पूर्ण का होत नाही? त्याचे कारण सांगितले आहे, जे ऐकल्यानंतर अनेकांची झोप उडाली.
वोकहार्ट हॉस्पिटल सर्वेक्षणानुसार, मुंबईतील तब्बल ६३.५७ टक्के लोक आठवड्यातील सहा दिवस ६ तासांपेक्षा कमी झोप घेतात. ही समस्या जागतिक स्तरावर शहरी जीवनशैलीच्या आव्हानांना प्रतिबिंबित करते. लोकांना माहिती आहे की, पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे, परंतु त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे त्यांना ते शक्य होत नाही, असे वोकहार्ट हॉस्पिटलचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजा यांनी म्हटले आहे. झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला केवळ एक पर्याय न मानता आरोग्याचा मूलभूत आधारस्तंभ मानण्याची वेळ आली आहे, असाही त्यांना इशारा दिला.
आवाजांमुळे झोप येत नाही
सर्वेक्षणात ६४.२३ टक्के लोकांनी ध्वनी प्रदुषणामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसल्याचे सांगितले. मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाची कामे आणि वाहनांच्या हॉर्नच्या आवाजामुळे झोप येत नाही, असे त्यांनी म्हटले. पंरतु, अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, जे आजारपणाला आमंत्रित करते.
सुट्टीच्या दिवशी झोप पूर्ण करणार
या सर्वेक्षणात सर्वांना आश्चर्यचकीत करणारी गोष्ट समोर आली. ५९.६२ टक्के लोकांना वाटते की, ते सुट्टीच्या दिवशी आठवड्याभराची झोप पूर्ण करतील. डॉ. मखीजा यांच्या मते, हा समज चुकीचा आहे. शनिवारी आणि रविवारी जास्त झोपून आठवड्याभराची झोप पूर्ण करता येत नाही.
सर्वेक्षणातील सकारात्मक गोष्टी
सर्वेक्षणात काही सकारात्मक चिन्हे देखील आढळली. सुमारे ७५.४० टक्के लोकांना झोपण्यापूर्वी शांतता हवी. तर, ५५.७४ टक्के लोक झोपेचा त्याग करत नाहीत, कोणत्याही परिस्थितीत ते आपली झोप पूर्ण करतात. दरम्यान, ५२.६६ टक्के लोकांना माहित होते की, अपूर्ण झोप मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम करते.