Mumbai Water: मुंबई टँकर असोसिएशनच्या बंदमुळे २ हजार बांधकाम साइटवर पाणीटंचाईचे सावट? अनेक इमारती, मॉललाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:54 IST2025-04-11T14:51:37+5:302025-04-11T14:54:05+5:30
Mumbai Water Tanker Strike: मुंबई टँकर असोसिएशनने बुधवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदचा फटका मुंबईतील सुमारे दोन हजारांहून अधिक बांधकामाच्या साइट्सना बसला आहे.

Mumbai Water: मुंबई टँकर असोसिएशनच्या बंदमुळे २ हजार बांधकाम साइटवर पाणीटंचाईचे सावट? अनेक इमारती, मॉललाही फटका
Mumbai Water Crisis: मुंबई टँकर असोसिएशनने बुधवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदचा फटका मुंबईतील सुमारे दोन हजारांहून अधिक बांधकामाच्या साइट्सना बसला आहे. पहिल्या दिवशी टँकरकोंडीचा परिणाम जाणवला नसला तरी शुक्रवारपासून सर्वच साइटवर पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रस्ते कामांसह निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या बांधकामांवर होणार आहे.
विहीर, बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्यास त्यांनी त्या बंद कराव्यात, अशा नोटीस महापालिकेने दिल्या आहेत. पाणी नसेल, तर ते पुरविणार कसे, असा पवित्रा मुंबई टँकर असोसिएशनने घेतला आहे.
केंद्राच्या सेंट्रल ग्राऊंड वॉटर अथॉरिटीच्या जाचक अटींसह पालिकेच्या नोटिशीविरोधात असोसिएशन गुरुवारपासून आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत सध्या दोन हजार बांधकामांच्या साइट्स सुरू आहेत. असा दावा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने केला आहे. या साइटसमध्ये कोस्टल रोड, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह निवासी व व्यावसायिक इमारती आहेत. या साइट्सवर बऱ्यापैकी पाण्याचा साठा करण्यात आल्याने गुरुवारी पहिल्या दिवशी टँकर बंदचा फटका बसलेला नाही. मात्र, शुक्रवारी साइट्सवर पाण्याचा ठणठणाट जाणवू शकेल, असे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले.
...तर बुलेट ट्रेनच्या बांधकामालाही फटका
एनएचएसआरसीएल मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भूमिगत स्टेशनचे बांधकाम करत आहे. मुंबईतील टँकरसेवा काही दिवसांसाठी बंद राहिल्यास त्याचा कमीत कमी परिणाम या बांधकामास होऊ शकतो. परंतु, दीर्घकाळ परिस्थिती अशीच राहिल्यास बांधकामास मोठा फटका बसेल, असे बुलेट ट्रेन प्रकल्पातील सुत्रांनी सांगितले.
मुंबईच्या विविध भागांतून गुरुवारी पाण्याच्या मागणीसाठी आम्हाला फोन आले. चढ्या दराने पाणी विकत घेण्यास नागरिक तयार आहेत. परंतु मुख्यमंत्री जोपर्यंत आमच्याशी चर्चा करत नाहीत आणि जाचक प्रक्रियेतून सुटका करत नाहीत, तोपर्यंत आम्ही पाणीपुरवठा बंद ठेवण्यावर ठाम आहोत. आम्हाला मुंबईतील नागरिकांना वेठीस धरायचे नाही, मात्र प्रशासनाकडून आम्हाला होणार त्रास त्यांनी बद करावा. त्यावर लवकर तोडगा काढावा.
- अंकुर शर्मा, प्रवक्ता, मुंबई वॉटर टँकर्स असोसिएशन
टँकरचे पाणी न मिळाल्यास बांधकाम साइट्सवरील कामे बंद होऊ शकतात. या उद्योगावर १० टक्के नागरिक अवलंबून असून त्यांच्यावर परिणाम होईल. टँकर असोसिएशन आणि पालिकेने तत्काळ यावर तोडगा काढावा. पहिल्या दिवशी परिणाम जाणवला नसला तरी याचा मोटा फटका बसण्याची शक्यता आहे.
- आनंद गुप्ता, उपाध्यक्ष, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया